आरंभ’ कला-साहित्य मंचाचा बहारदार रंगारंग शुभारंभ
मिरा-भाईंदर (गुरुदत्त वाकदेकर) : अमिता जोशी आणि कल्पना दिलीप मापूसकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘आरंभ’ या कला-साहित्य मंचाचा पहिला रंगारंग कार्यक्रम शनिवार १९ एप्रिल, २०२५ रोजी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा संस्था, भाईंदर येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष शंकर जंगम यांनी पूजन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केले. त्यानंतर अमिता जोशी यांच्या सुमधूर स्वरात सादर झालेल्या ‘ओंकार’ या गणेश वंदनेने वातावरण मंगलमय केले.
ध्वनी शाह यांच्या पुष्पांजलीने आणि ऋतूल पारेख, मृदुला विश्वास, शिखा शाह यांच्या ‘त्रिश्लोकम’ नृत्य सादरीकरणाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
‘देवता’ ही लेखिका विजया वाड यांची कथा सरोज गाजरे यांनी सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.
भूपाल चव्हाण या जातिवंत गझलकारांनी ‘चूक होती का खरी’ ही भावस्पर्शी गझल सादर करत रसिकांच्या मनात घर केले.
अरविंद देशपांडे यांची ‘लावण्य’ ही कविता स्त्रीच्या तारुण्यसौंदर्याचे प्रत्ययकारी चित्र उभे करत असतानाच, कल्पना दिलीप मापूसकर यांनी ‘संध्याछाया’ ही कविता सादर करत उतारवयातील स्त्रीसौंदर्याचे समर्पक चित्रण केले. ‘तरीही म्हणता राव, देखणं आहे तुमचं लावण्य’ या धृपदाने उपस्थितांची मने जिंकली.
जगदीश अबगुल यांनी ‘स्वर गंगेच्या काठावरती’ हे गीत सादर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. सरोज गाजरे यांनी स्त्रीवर लादलेल्या सामाजिक बंधनांवर भाष्य करणारी ‘चौकट’ ही कविता सादर केली.
लावणी सम्राट विलास कुलकर्णी यांनी सादर केलेल्या ‘अँटी’ या ठसकेबाज लावणीने रंगत आणली –
“सपनात सुदिक मला असं कुणी बोललं न्हाई,
ह्यो ह्यो टकल्या मेला, मला अँटी बोलला बाई…”
या धृपदाने वातावरणात हास्याची लहर उसळली.
त्यानंतर अमिता जोशी यांनी ‘रेशमाच्या रेघांनी’ ही लावणी सादर करत कार्यक्रमात अधिक रंग भरला. वन्समोअरचा आवाज प्रेक्षकांतून पुनः एकवार दुमदुमला.
होडवेकर यांनी आपला दमदार आवाज लाभलेल्या कविता सादर करत श्रोत्यांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाच्या अखेरीस अमिता जोशी यांनी पुन्हा आपल्या कोकीळ कंठातून ‘कोकीळ कुहू… कुहू… बोले’ हे गीत सादर करत मन जिंकले.
सांस्कृतिक कला मंचच्या समूहाने सादर केलेले ‘माऊली… माऊली…’ हे सामूहिक नृत्य विशेष दाद मिळवत लक्ष वेधून गेले.
कार्यक्रमातील सहभागी सर्व कलाकारांचा विरंगुळा केंद्रातर्फे फुलांच्या गुच्छांनी मन:पूर्वक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता ‘पसायदान’ आणि ‘राष्ट्रगीत’ याच्या सामूहिक सादरीकरणाने अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिता जोशी यांनी अतिशय ओघवत्या, रसाळ शैलीत करत रसिकांना क्षणभरही दुरावू दिलं नाही. त्यांच्या शैलीदार निवेदनाने कार्यक्रमाची एकसंध गुंफण साधली.
‘आरंभ’ चा हा पहिला कार्यक्रम आपल्या नावाप्रमाणेच कलारसिकांच्या मनात संस्मरणीय ठसा उमटवत, एक नवे दालन खुले करून गेला.