श्री भैरी भवानी गोंधळाचा सुवर्ण महोत्सव…! तवसाळ-पडवे, गडदे भावकीच आयोजन …
इतिहास, परंपरा, श्रद्धा आणि वीरगाथांचा संगम
तवसाळ (ता. गुहागर) – दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी तवसाळ गावात श्री भैरी भवानी गोंधळ घर मुख्य देवस्थानात सुवर्ण महोत्सवी गोंधळ उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन गडदे भावकीतर्फे ( भंडारी समाज) करण्यात आले असून, गुरुवारी २४ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजेने या उत्सवाची सुरुवात होईल, तर शुक्रवार, २५ एप्रिल रोजी गोंधळ सोहळा पार पडेल.
गोंधळ परंपरेचा इतिहास आणि सामाजिक महत्त्व
गोंधळ ही महाराष्ट्रातील पारंपरिक आणि धार्मिक समारंभाची एक प्राचीन परंपरा आहे. विशेषतः भंडारी, मराठा, वैश्यवाणी आदी समाजांमध्ये लग्नकार्याच्या निमित्ताने गोंधळ घालण्याची परंपरा आहे. कुलस्वामिनी देवीसमोर बोकडाची आहुती देऊन तिची पूजा केली जाते आणि संपूर्ण गावाला मटण जेवण घालून हा सोहळा संपन्न होतो. या परंपरेला धार्मिक श्रद्धा, कौटुंबिक ऐक्य आणि सामाजिक बांधिलकीची एकत्रित भावना जोडलेली आहे.
महागाई आणि बदलत्या जीवनशैलीमुळे काही काळ ही परंपरा बंद झाली होती. मात्र, सन १९७५ मध्ये पंचक्रोशीतील खोत कै. यशवंत कृष्णा गडदे यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली गडदे भावकीने एकत्र येऊन ही परंपरा पुन्हा सुरू केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज ही परंपरा ५० वर्षे पूर्ण करत असून, यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून मोठ्या भक्तिभावाने साजरी होत आहे.

गडदे भावकीचा गौरवशाली इतिहास
गोंधळाच्या निमित्ताने गडदे भावकीच्या इतिहासालाही उजाळा मिळत आहे. या कुटुंबाचे मूळ गाव नांदिवडे असून, मूळ आडनाव शिरधनकर असे होते. त्यामुळे शिरधनकर आणि गडदे यांचे नाते संबंधात (बेटी) लग्न जुळवत नाहीत. छ.शिवाजी महाराजांच्या काळात शिरधनकर पूर्वज जयगड किल्ल्यावर किल्लेदार म्हणून नेमले गेले. गडावर वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘गडदे’ अशी ओळख प्राप्त झाली. पुढे ते गडदे याच आडनावाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर काही पूर्वजांनी विजयगड (जयगड च्या पलीकडे ) किल्ल्याच्या रक्षणासाठी अ सणाऱ्या तवसाळ येथे स्थायिक होणे पत्करले.
वीरगाथा: बाबजी वीर गडदे आणि नारायण वीर गडदे
विजयगड किल्ल्याच्या रक्षणासाठी बाबजी वीर गडदे आणि नारायण वीर गडदे या दोन शूर बंधूंनी किल्लेदारीची जबाबदारी स्वीकारली होती. एका यवन आक्रमणादरम्यान त्यांनी तुटपुंज्या सैन्याच्या मदतीने मोठ्या पराक्रमाने शत्रूला पराभूत केले. शत्रूंना कडव्या प्रतिकारानंतर पळवून लावण्यात आले, काही शत्रू सैनिक रोहीले काशिविदा मार्गे तर काही कातळे या ठिकाणी पळताना त्यांचा पाठलाग करत असताना या लढाईत दोघांनाही वीरमरण आले.
नारायण वीर गडदे यांना रोहिले मोहितेवाडी (आजचे तवसाळ) येथे वीरमरण आले. बाबजी वीर गडदे किल्ल्याजवळच हुतात्मा झाले आणि त्यांच्या पत्नीने सती जाण्याचा निर्णय घेतला. . या तिन्ही ठिकाणी स्मृतीस्थळे, मठ, आणि पूजास्थाने आजही आहेत. लग्नप्रसंगी ह्या ठिकाणी नारळ, विडा अर्पण करून मान दिला जातो – ही प्रथा म्हणजे वीरगती व सतीत्वाला दिलेला लोकमान्य श्रद्धासुमन आहे स्मृतीस्थळांवर सन्मानपूर्वक मानपान दिला जातो, विशेषतः लग्नप्रसंगी ‘हुल्फा’ म्हणून नारळ, विडा अर्पण केला जातो. याच ठिकाणी गडदे भावकीने मठ (स्मृती स्थळ) उभारले असून, ही स्थळे आजही श्रध्देने जपली जात आहेत.
आजचा गोंधळ – परंपरेचा सन्मान, संस्कृतीची जपणूक
गोंधळ परंपरेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष हे केवळ धार्मिक उत्सव नसून संस्कृती, इतिहास आणि कुटुंबिक ऐक्याचे प्रतीक आहे. गडदे भावकीतील सर्व सदस्यांनी परंपरेची सातत्याने जपणूक करत गोंधळाचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. नव्या पिढीला आपल्या परंपरेची आणि वीरपूर्वजांच्या पराक्रमाची जाणीव व्हावी, हा या उत्सवामागचा मुख्य हेतू आहे.
एक भावनिक आवाहन…
“गोंधळ परंपरेच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने मी माझ्या पूर्वजांचा, त्यांच्या बलिदानाचा आणि आमच्या परंपरेचा सन्मान करत आहे. ही माहिती माझ्या आई, मावशी व कै. वडिलांकडून आणि तवसाळ येथील खोत स्व. यशवंत कृ .गडदे यांचे कडून मिळालेल्या मोडी लिपीतील दस्तऐवजांच्या आधारे सर्व गडदे भावकीपर्यंत पोहोचवित आहे. श्री भैरी भवानी आई सर्वांना आरोग्य, समृद्धी आणि वैभव प्रदान करो.” सर्वांना पुन्हा एकदा शुभेछ्या या कार्यक्रमाला येणाऱ्या सर्व गडदे स्नेही, भावकी, आत्पेष्ट, मित्रमंडळी आणि भंडारी समाज बांधव यांना आग्रहाचे निमंत्रण.
— आपला भाऊ,
श्री. गजानन यशवंत गडदे. (पडवे) . ???? 9405986598
आजच्या या सुवर्ण महोत्सवी गोंधळात फक्त विधी नाही, तर संपूर्ण भावकीचा इतिहास, परंपरा आणि संस्कृतीच जिवंत होणार आहे. गडदे भावकीतील सर्व पिढ्या – ज्येष्ठ, मध्यमवयीन, युवक व बालके – एकत्र येऊन सामूहिक कार्य करत आहेत. अशा सोहळ्यांमधून समाजात एकात्मता निर्माण होते. नव्या पिढीला आपल्या मुळांची, इतिहासाची आणि संस्कृतीची जाणीव होते.
या गोंधळाच्या निमित्ताने आपण सर्वांनी केवळ परंपरेचा सन्मान करायचा नसून, तिच्या माध्यमातून धर्म, संस्कृती, एकात्मता आणि इतिहास यांचा संगम कसा जपता येईल, हे लक्षात ठेवायला हवे. भैरी भवानी मातेच्या चरणी प्रार्थना – “तिचा आशीर्वाद आम्हा सर्वांवर राहो, आणि आमची परंपरा, आमची श्रद्धा आणि आमचा इतिहास सन्मानाने पुढे जात राहो.” श्री भैरी भवानीचा आशीर्वाद – सन्मानाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळो. या संपूर्ण कार्यक्रमाला रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र द्वारे हार्दिक शुभ कामना – आपला – श्री सुजेंद्र सुर्वे, संपादक .
|
हॅशटॅग्स:
#भैरीभवानी #गोंधळउत्सव #सुवर्णमहोत्सव #गडदेभावकी #इतिहासगौरव #शिवकालीनपरंपरा #तवसाळपडवे #जयगडकिल्ला #वीरगाथा #महाराष्ट्रीयसंस्कृती