गुहागर ते शासकीय विश्रामगृह खराब रस्ता: रविवार ११ मे रोजी आंदोलनासाठी नियोजन बैठक
प्रशासनाच्या टाळाटाळीला नागरिकांचा वैताग; विशाल बोटिंग क्लब, मोडकाआगर येथे आंदोलनाच्या रणनीतीवर चर्चा
आबलोली (संदेश कदम) –
गुहागर ते तिसरे वाकण शासकीय विश्रामगृहापर्यंतचा मुख्य रस्ता चांगल्या प्रतीचा कार्पेट करून द्यावा, या मागणीसाठी ‘गुहागर प्रेमी नागरिक’ गटाच्या वतीने लोकशाही दिनी प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी दोन दिवसांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी जनतेसमोर येतील, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र प्रत्यक्षात कुठलाही ठोस निर्णय न घेता तहसील कार्यालयाच्या माध्यमातून केवळ पत्रव्यवहार करून जबाबदारी झटकण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर आता पुढील आंदोलनाच्या रूपरेषेबाबत निर्णय घेण्यासाठी एक विशेष नियोजन बैठक रविवार, ११ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मोडकाआगर येथील विशाल बोटिंग क्लबमध्ये आयोजित करण्यात आली आहे. आंदोलनाची दिशा आणि स्वरूप या बैठकीत ठरवले जाणार आहे.
‘गुहागर प्रेमी नागरिक’ गटाचे पदाधिकारी समाजसेवक विष्णुनाथ रहाटे, अनिल शिंदे, विकास जाधव, सुमित आठवले, पराग कांबळे आणि इतर नागरिकांनी प्रशासनास इशारा दिला आहे की, जर राष्ट्रीय महामार्ग अधिकारी रस्त्याचे काम लवकर हाती घेत नाहीत, तर आंदोलन उग्र करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
#गुहागर #रस्त्याचीदुर्दशा #राष्ट्रीयमहामार्ग #आंदोलन #विश्रामगृहमार्ग #RatnagiriNews #GuhagarDevelopment