देवरुखमध्ये बाव नदीवर धरणाचे भूमीपूजन; पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा – ना. उदय सामंत
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी १ कोटींचा निधी, ५० हजार मुलींना मोफत कर्करोग प्रतिबंधक लस देणारा रत्नागिरी देशात पहिला जिल्हा ठरणार
देवरुख (ता. संगमेश्वर): देवरुख नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या पाणीपुरवठा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बाव नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाच्या बांधकामाचे भूमीपूजन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी बोलताना ना. सामंत यांनी सांगितले की, “देवरुख शहरातील प्रत्येक नागरिकाला नियमित पाणी मिळावे, यासाठी नगरपंचायतीने केलेले नियोजन कौतुकास्पद आहे. या कामासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.”
त्याचबरोबर देवरुख शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १ कोटी रुपये देण्याचा निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केला. संगमेश्वर तालुका हा ऐतिहासिक वारसा लाभलेला भाग असून छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यासाठीही आवश्यक निधी दिला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घोषणा करताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यातील ९ ते १४ वयोगटातील ५० हजार मुलींना मोफत कर्करोग प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, असं करणारा रत्नागिरी हा देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे.
या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने, बाबू म्हाप, मृणालताई शेट्ये, अभिजीत शेट्ये, सचिन मांगले, तहसीलदार श्रीमती साबळे, मुख्याधिकारी श्री. विसपुते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. सुर्वे, कार्यकारी अभियंता गणेश सलगर, हनिफ हरचिरकर, प्रफुलजी भुवड, वैभव पवार, दोन्ही गावचे सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—
#देवरुख #पाणीपुरवठा #बावनदीधरण #उदयसामंत #शिवाजीमहाराजपुतळा #रत्नागिरीविकास #कर्करोगप्रतिबंध #SambhajiSmarak #RatnagiriNews #KonkanDevelopment