???? तवसाळ तांबडवाडी येथे वटपौर्णिमा सण साजरा
सानवी येद्रे यांनी माहेरी येत साजरा केला नात्यांचा, श्रद्धेचा आणि प्रेमाचा वटसण
गुहागर, तवसाळ (प्रतिनिधी) –
भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, निसर्गपूजन आणि सौभाग्याचे प्रतीक असलेला वटपौर्णिमा सण तवसाळ तांबडवाडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. नुकतेच लग्न झालेले सौ. सानवी सचिन येद्रे या आपल्या माहेरी आल्यावर त्यांनी पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमेचा सण साजरा केला.
सानवी येद्रे यांनी आपल्या ताई आणि वहिनींसोबत मिळून वडाच्या झाडाखाली नित्यनेमाने पूजा केली. पूजेनंतर आजी व गावातील वडीलधाऱ्यांना वटवृक्षाचे वान देऊन त्यांचे शुभाशीर्वादही घेतले.
हा सण साजरा करताना सर्व स्त्रियांनी पारंपरिक वेषभूषा करून श्रद्धेने पूजा अर्पण केली.
वटपौर्णिमा केवळ व्रत नव्हे, तर भारतीय स्त्रीच्या निष्ठा, प्रेम व आत्मशक्तीचे प्रतीक मानली जाते. पौराणिक सावित्री-सत्यवान कथेमुळे या सणाला अध्यात्मिक महत्त्व लाभले आहे. या निमित्ताने निसर्गस्नेह, पर्यावरण पूजन, आणि स्त्रीशक्तीचा सन्मान या मूल्यांना पुन्हा उजाळा मिळतो.