मुंबईतील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला यश: गिरीश महाजनांकडून मागण्या मान्य करण्याची घोषणा
आझाद मैदानातील पाच दिवसीय आंदोलनाची सांगता; लवकरच खात्यात वेतन जमा होणार
मुंबई: गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. शिक्षकांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आज (शुक्रवारी) सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारतर्फे शिक्षकांच्या सर्व मागण्या मान्य करण्याची घोषणा केली. तसेच, विधानमंडळ अधिवेशन संपल्यानंतर शिक्षकांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे आश्वासनही महाजन यांनी दिले.
गिरीश महाजन यांनी शिक्षकांना संबोधित करताना सांगितले की, “आमची भूमिका सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारला तुमची काळजी आहे. आम्हाला माहिती आहे की, आपण सामान्य कुटुंबातील आहात. तुमची रोजीरोटी हीच आहे, त्यामुळे अतिशय धाडसी निर्णय फडणवीसांनी त्यावेळी घेतला. त्यानुसार, 20 टक्के, 40 टक्के त्यानंतर 60 टक्के अनुदान दिले. सरकारी तिजोरीवरील आर्थिक संकटामुळे आमच्याकडून पुढचे टप्पे देण्यास उशीर झालेला आहे. तुम्ही याबाबत वारंवार मागणी करत होता. पण आता तुमचा पगाराचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. आम्हाला तुमच्या खात्यात पगार टाकायचाच आहे.”
राज्यातील सुमारे पाच हजार खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने शासकीय अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2024 मधील विधानमंडळ अधिवेशनात घेण्यात आला होता. मात्र, त्या निर्णयाला आता दहा महिने उलटूनही प्रत्यक्ष निधीच्या तरतुदीचा कोणताही ठोस निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे या शाळांमधील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती आणि सरकारच्या दिरंगाईविरोधात त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता.
सध्या राज्यात 5,844 अंशतः अनुदानित खासगी शाळा आहेत, ज्यात 820 प्राथमिक, 1,984 माध्यमिक आणि 3,040 उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये एकूण 3,513 प्राथमिक, 2,380 माध्यमिक आणि 3,043 उच्च माध्यमिक तुकड्या कार्यरत आहेत. याशिवाय, एकूण 8,602 प्राथमिक शिक्षक, 24,028 माध्यमिक शिक्षक आणि 16,932 उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या शाळांमध्ये कार्यरत आहेत.
#शिक्षकआंदोलन #मुंबई #आझादमैदान #विनाअनुदानितशिक्षक #महाराष्ट्रसरकार #गिरीशमहाजन #वेतनवाढ #शिक्षणविभाग #शिक्षकांचेहक्क #शिक्षकएकजूट #MaharashtraTeachers #ProtestSuccess #EducationNews #TeachersRights #Mumb
aiNews

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.