Nitesh Rane Controversy: “मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला धक्का,” अल्पसंख्यांक आयोग अध्यक्षांचा आरोप!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

💥 Nitesh Rane Controversy: “मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला धक्का,” अल्पसंख्यांक आयोग अध्यक्षांचा आरोप!

#NiteshRane #DevendraFadnavis #MinorityCommission #MaharashtraPolitics #NagpurNews #PyareKhan #BJP #Congress #MuslimCommunity #EducationReform #SocialJustice

नागपूर: महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नुकतीच लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली, ज्यात काँग्रेस पक्षावरील टीका आणि मंत्री नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्यारे खान म्हणाले की, “नितेश राणे यांना फक्त चर्चेत राहायचे आहे, त्यामुळे ते नाहक मुस्लिम समाजावर आरोप करतात. मात्र, यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला धक्का लागतोय आणि त्यांचे नाव खराब होत आहे. जर फडणवीसांचे नाव खराब होत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे राणेंना आवर घालण्याची मागणी केली आहे.”

काँग्रेसवर निशाणा, विकासाचे आवाहन:

खान यांनी काँग्रेस पक्षावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, “गेल्या ७० वर्षांपासून काँग्रेसने केवळ मुस्लिमांना मूर्ख बनवून ठेवले आहे. केवळ मतांसाठी समाजाचा वापर करून मोठे नुकसान केले. त्यांनी भाजपविरोधात मुस्लिमांमध्ये विष पेरले. आजही निवडणुका आल्या की, सोशल मीडियावर चुकीच्या चित्रफिती पसरवल्या जातात. मात्र, आपल्याला प्रगती करायची असेल तर पुढे जावे लागेल. आजही जर आपण गुजरात दंगल किंवा बाबरी मशीद यांसारख्या भूतकाळातील घटनांना चिकटून बसलो, तर कधीच विकास करू शकणार नाही.”

शिक्षणावर भर, उर्दू शाळांमध्ये बदल:

प्यारे खान यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबतच्या कामाचा अनुभव सांगत, विकासाचे एक निश्चित ध्येय ठेऊन काम सुरू असल्याचे सांगितले. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून त्यांनी अल्पसंख्याक शाळांच्या सुधारणेवर भर दिला आहे. मुस्लिम समाजात असलेल्या कला, कौशल्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ते देशातील मोठे उद्योगपती आणि सर्वाधिक करदाते बनू शकतात; मात्र शिक्षणाच्या अभावामुळे समाज मागे पडल्याचे त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, “राज्यातील सर्व अल्पसंख्याक शाळांमध्ये अनेक वर्षांपासून उर्दू भाषेतून शिक्षण दिले जाते. उर्दू भाषेला विरोध नाही; पण त्या भाषेतून विज्ञान आणि गणिताचे शिक्षण देऊन विकास होणे शक्य नाही. अनेक मुस्लिम विद्यार्थ्यांमध्ये पोलीस भरतीत उत्तीर्ण होण्याची क्षमता आहे, पण मराठी भाषा येत नसल्याने ते परीक्षेत मागे पडतात. त्यामुळे सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य केली, तसेच इंग्रजी माध्यम लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक शाळांनी याचा स्वीकारही केला आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “अनेक शाळांमध्ये चांगले शिक्षक नव्हते आणि नातेवाईकांना नोकरी दिली जात होती. यावर बंधने आणून शाळा सुधारण्याला पहिले प्राधान्य दिले. शिक्षणाशिवाय मुस्लिम बांधवांचा विकास अशक्य आहे.”

अल्पसंख्यांक आयोगाचे कार्य आणि यश:

प्यारे खान यांनी आयोगाच्या कार्याबद्दल माहिती दिली. आजवर अल्पसंख्याक आयोग काय आहे, हे लोकांना माहीत नव्हते. या आयोगात विविध धर्माचे लोक येतात आणि सर्वांना न्याय देण्यासाठी मागील एक वर्षापासून काम सुरू आहे. मुस्लिम समाजात वाढणारे ‘तलाक’चे प्रमाण रोखण्यात आणि ‘बहूपत्नीत्व’ या परंपरेमुळे त्रस्त महिलांच्या अनेक प्रकरणांमध्ये मध्यस्थी करून संसार वाचवण्यात आयोगाला यश आल्याचेही त्यांनी सांगितले.

शेवटी, खान यांनी आवाहन केले की, “सरकारला बदनाम करून विकास होणार नाही. विकसित भारतामध्ये सर्वांना संधी असून, प्रत्येकाने आपली कौशल्ये विकसित करून

पुढे यावे.”

Ratnagiri Office
Author: Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...