दिल्लीत राजकीय हालचालींना वेग: काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंना ‘INDIA’ बैठकीचं निमंत्रण!
ठाकरे-मनसे युतीच्या चर्चेदरम्यान दिल्लीवारीची शक्यता; सोनिया गांधींच्या नेतृत्वात १९ जुलैला महत्त्वपूर्ण बैठक
मुंबई/दिल्ली: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असतानाच, महाविकास आघाडीत (MVA) ‘स्वबळा’ची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. याचदरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना युतीसाठी साद घातल्याचे चित्र असतानाच, आता त्यांच्या दिल्ली दौऱ्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने उद्धव ठाकरेंना दिल्ली दौऱ्याचे निमंत्रण दिल्याने राष्ट्रीय राजकारणातील हालचालींना वेग आला आहे.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या ‘INDIA’ आघाडीने भाजपला जोरदार टक्कर दिली असली तरी, त्यानंतर हरयाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ‘INDIA’ आघाडी आणि MVA च्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेसने पुन्हा एकदा विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांना फोन करून ‘INDIA’ आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक १९ जुलै रोजी दिल्लीत आयोजित करण्यात आली असून, काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी या बैठकीचे नेतृत्व करणार आहेत.
या बैठकीचा मुख्य उद्देश विरोधी पक्षांमध्ये पुन्हा एकदा एकजूट दाखवणे हा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आघाडीची बैठक न झाल्याने घटक पक्षांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आणि बिहारमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘INDIA’ आघाडीची पुन्हा जुळवाजुळव सुरू झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर एकत्रितपणे जनतेचे प्रश्न मांडता यावेत, यासाठी ‘INDIA’ आघाडीची बैठक आवश्यक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी अनौपचारिकपणे म्हटले होते. त्यानंतरच काँग्रेसकडून या हालचाली सुरू झाल्या आहेत.
#PoliticsInMaharashtra #UddhavThackeray #INDIAAlliance #Congress #SoniaGandhi #MVA #DelhiPolitics #संजयराऊत #केवेणुगोपाल #राजकीयबातम्या #महाराष्ट्रराजकारण #दिल्लीवारी #स्थानिकस्वराज्यसंस्था #रा
जठाकरे