कवितांनी गाठला अंतःकरणाचा तळ – भाईंदरमध्ये साकार झाला भावनांचा काव्यमहोत्सव
ज्येष्ठ नागरिक विरंगुळा संस्थेच्या निमंत्रित कविसंमेलनात विविध कवींच्या सर्जनशील रचनांनी रसिक मनं भारावली
भाईंदर (गुरुदत्त वाकदेकर) : कविता केवळ शब्दांची सजावट नसते, ती भावना व्यक्त करण्याची नाजूक, पण प्रभावी भाषा असते. अशाच भावनांच्या छायेत विरघळत आणि शब्दांच्या ओघात झुलत अंतःकरणाचा तळ गाठत भाईंदर (पूर्व) येथील हनुमान मंदिराजवळील सभागृहात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा संस्थेच्या वतीने आयोजित मराठी भाषेतील निमंत्रित कवींच कविसंमेलन अत्यंत साहित्यिक वातावरणात साजरं झालं. हा कार्यक्रम रसिकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळणारा ठरला.
डॉ. लक्ष्मण शिवणेकर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, बालसाहित्य व भक्तिसाहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. कविता हा एक विचार असतो उत्कट भावनांचा आविष्कार असतो. विचार आणि भावना यांच्या संयोगाने कविता जन्माला येते असे डॉ. शिवणेकर अध्यक्षीय समारोपात करताना म्हणाले.त्यांच्या विचारपूर्ण मनोगतातून कविता आणि मूल्यसंवेदनशीलतेचं नातं प्रभावीपणे उलगडलं.
या कविसंमेलनात मुंबई आणि गुजरात राज्यातील विष्णु घोगळे, मधुकर तराळे, हरिश्चंद्र मिठबावकर, राजेंद्र चौधरी, प्रमोद सुर्यवंशी, विक्रांत मारुती लाळे, रामचंद्र भडवळ, संतोष धर्मराज मोहिते, सरोज सुरेश गाजरे, प्रो. डॉ. लक्ष्मण शिवणेकर, वसुंधरा शिवणेकर, पांडुरंग होडावडेकर, भूपाल चव्हाण, शंकर जंगम, नमाई सुभाष नाईक, विजया म्हात्रे, राजेश्री पवार, महेंद्र पाटील, आनंद ढाले (सिलवासा), सुनिता महाजन, कल्पना दिलीप मापूसकर आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर या निमंत्रित कवींच्या सर्जनशील सादरीकरणाने उपस्थित रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तसेच कवींच्या कविता, विविध शैली, विषय, छंद व भावना एकत्रित करून एका वैश्विक काव्य अनुभवाची उंची गाठत होत्या.
या संमेलनात सर्व सहभागी कवींना गुलाबपुष्प, सन्मानपत्र, ‘कवितांजली’ वासंतिक विशेषांक, तसेच प्रो. डॉ. लक्ष्मण शिवणेकर लिखित ‘सशा रे सशा तुझ्या तुपातल्या मिश्या’ हे बालनाट्य व ‘भक्तिवंदना’ हा आरतीसंग्रह तसेच राजेंद्र डाखवे यांच्याकडून सन्मान भेटवस्तू सप्रेम प्रदान करण्यात आल्या.
संमेलनाचे सूत्रसंचालन सरोज सुरेश गाजरे यांनी नेमक्या शब्दांत केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन भूपाल चव्हाण यांनी केले. त्यांनी उपस्थित सर्व कवींच्या सर्जनशील योगदानाबद्दल आस्थेपूर्वक उल्लेख करत, संस्थेच्या सांस्कृतिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या सोहळ्यास ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक अनंत आंगचेकर आणि साहित्यिक पत्रकार डॉ. अनुज अविनाश केसरकर यांचीही उपस्थिती लाभली. त्यांच्या साहित्यिक दृष्टिकोनातून कार्यक्रमाला विशेष वैचारिक वजन प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संस्थेचे अध्यक्ष शंकर जंगम, सेक्रेटरी गंगाराम पवार आणि कार्यक्रम व्यवस्थापक सदाशिव चव्हाण यांच्या सहकार्यातून अत्यंत सुबकपणे व नेमकेपणाने करण्यात आले.
भावनांचे पदर उलगडणाऱ्या, मनाला भावणाऱ्या आणि कविता म्हणजे जीवनाचा आरसा असतो, हे पुन्हा एकदा जाणून देणाऱ्या या संमेलनाने भाईंदरच्या सांस्कृतिक वाटचालीत एक हृदयस्पर्शी आणि गौरवशाली पाऊल नोंदवले.