लष्करातल्या अधिकाऱ्याचं संतापजनक कृत्य: ‘एक्स्ट्रा बॅगेज’वरून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, एकाचा मणका मोडला!
श्रीनगर: श्रीनगर विमानतळावर एका लष्करी अधिकाऱ्याने अतिरिक्त सामानासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर चार स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत एका कर्मचाऱ्याचा मणका तुटला तर दुसऱ्याचा जबडा मोडला. ही घटना २६ जुलै रोजी घडली असून, याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. आरोपी अधिकारी लेफ्टनंट कर्नल रितेश कुमार सिंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्पाइसजेटने त्याला ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये टाकलं आहे. लष्करानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचं आश्वासन दिलं आहे.
अतिरिक्त सामानावरून वाद, अधिकारी हिंसक
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानातील प्रवासी बोर्डिंग करत असताना ही घटना घडली. लेफ्टनंट कर्नल रितेश कुमार सिंग हे दोन केबिन बॅग घेऊन आले होते. या बॅगचं वजन १६ किलो होतं, जे नियमांनुसार असलेल्या ७ किलोच्या मर्यादेपेक्षा जास्त होतं. स्पाइसजेट कर्मचाऱ्यांनी त्यांना अतिरिक्त सामानासाठी शुल्क भरण्यास सांगितलं, पण सिंह यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून वाद सुरू झाला.
वाद विकोपाला गेल्यावर सिंह यांनी बोर्डिंग पूर्ण न करताच जबरदस्तीने एअरोब्रिजमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, जो सुरक्षा नियमांचा भंग होता. कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, सिंह यांचा संताप अनावर झाला. त्यांनी रांगेसाठी वापरला जाणारा लोखंडी स्टँड उचलून कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.
कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला
सिंह यांनी केलेल्या या अमानुष हल्ल्यात अनेक कर्मचारी गंभीर जखमी झाले. एका कर्मचाऱ्याच्या पाठीचा कणा मोडला, तर दुसऱ्याचा जबडा तुटला. तिसऱ्या कर्मचाऱ्याच्या नाकातून रक्त येऊ लागलं. चौथ्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला, तरीही सिंह त्याला लाथांनी मारत राहिले. या घटनेदरम्यान सीआयएसएफ जवानांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने त्यांनाही धक्काबुक्की केली. सर्व जखमी कर्मचाऱ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एअरलाईन आणि लष्कराची कठोर पाऊलं
या घटनेनंतर स्पाइसजेटने तात्काळ पोलिसांत एफआयआर दाखल केला. नागरी विमान वाहतूक नियमांनुसार, आरोपी अधिकाऱ्याला ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्यात आलं आहे. स्पाइसजेटने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दुसरीकडे, लष्करानेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आरोपी अधिकारी गुलमर्गमधील हाय एल्टिट्यूड वारफेअर स्कूलमध्ये (HAWS) कार्यरत आहे. लष्कराने नियमांनुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही त्याला अद्याप अटक झालेली नाही. या घटनेमुळे एका क्षुल्लक कारणावरून वर्दीचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्याच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
#MilitaryOfficer #SpiceJet #SrinagarAirport #Assault #AirlineStaff #NoFlyList #ArmyAction #ExtraBaggage #Violence #SpineFracture #JawBroken #ShockingIncident #ArmyDiscipline #श्रीनगरविमानतळ #लष्करीअधिकारी #मारहाण #स्पाइसजेटकर्मचारी #अ
मानुषहल्ला