माझी लाडकी बहीण योजनेचा गैरप्रकारे लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई!
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार, १००० हून अधिक कर्मचारी रडारवर
मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करत लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जात आहे. महिला व बालविकास विभागाने अशा एकूण १,१८३ कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास विभागाकडे पाठवली आहे. यावर कार्यवाही करत ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी (सीईओ) परिपत्रक जारी केले असून या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात गेल्या वर्षी जुलैपासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. सरकारने या योजनेसाठी काही पात्रता निकष निश्चित केले होते. मात्र, निवडणुकीच्या काळात ही योजना जाहीर झाल्याने पडताळणीवर जास्त भर दिला गेला नाही. त्यामुळे जे पात्र नव्हते अशा अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यात जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
महिला बालविकास विभागाने माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या यादीची तात्काळ दखल घेऊन ती ग्रामविकास विभागाकडे पाठवली आहे. ग्रामविकास विभागाने आता सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) या संदर्भात निर्देश दिले आहेत. या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद ही एक स्वायत्त संस्था असल्यामुळे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आहेत. म्हणूनच, ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून त्याचा अहवाल महिला आणि बालविकास विभागाला सादर करण्यास सांगितले आहे.
#MajhiLadkiBahin #सरकारीकर्मचारी #योजना #कारवाई #CMO #Mumba