राज्य नाट्य स्पर्धेत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत १० सप्टेंबरपर्यंत वाढली
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित राज्य नाट्य स्पर्धेत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत ३१ ऑगस्ट होती; मात्र गणेशोत्सव, पाऊसमान आणि इतर कारणांमुळे काही नाट्यसंस्था व संघटनांनी मुदतवाढ करण्याची विनंती केली होती.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या मागण्यांचा विचार करून जास्तीतजास्त संघांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी, यासाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ करण्याचे निर्देश संचालनालयास दिले. त्यानुसार, राज्य नाट्य स्पर्धेत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख १० सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली असल्याचे संचालक बिभीषण चवरे यांनी स्पष्ट केले आहे.
संपूर्ण राज्यभरातील नाट्यसंस्था आणि संघटनांना आता १० सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची संधी आहे. इच्छुक संघांनी https://mahanatyaspardha.com या अधिकृत वेबसाईटवर प्रवेशिका सादर कराव्यात, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
सांस्कृतिक रंगभूमीवरील प्रत्येक संघासाठी ही संधी अत्यंत महत्त्वपूर्ण असून, उत्साहवर्धक अनुभव घेण्यासाठी आणि आपल्या कला रंगाने स्पर्धा रंगवण्यासाठी ही अंतिम संधी मोठ्या उत्साहाने वापरावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.