पितृपक्षात स्वामी संस्थेचे अन्नदान : ८५० कॅन्सरग्रस्तांना आधार
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पितृपक्ष म्हणजे स्मरण, श्रद्धा व सेवा. या भावनेतून परळ परिसरातील रुग्णालये व रुग्णसेवेशी निगडित कार्यासाठी प्रसिद्ध असलेली “स्वामी” (सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन अॅण्ड एन्हायरमेंट) ही सेवाभावी संस्था गेली २५ वर्षांपासून निरंतर समाजोपयोगी कार्य करीत आहे. जनसेवा व्रत या उक्तीनुसार संस्थेतर्फे रुग्णसेवा केंद्र, मातृभाव प्रकल्प, विद्यार्थी सहाय्य योजना, विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्र, पॅथॉलॉजी, औषध पेढी, आदिवासी प्रकल्प, पर्यावरण प्रकल्प, अवयव दान चळवळ अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जाते.
यंदा पितृपक्ष रविवार दि. ७ सप्टेंबर २०२५ पासून रविवार दि. २१ सप्टेंबर २०२५ पर्यंत आहे. या काळात मातृभाव प्रकल्पांतर्गत दररोज ५० कॅन्सरग्रस्त रुग्णांना आणि शेवटया दिवशी अर्थात सर्वपित्री अमावस्येला १५० रुग्णांना अन्नधान्याचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. अशा प्रकारे एकूण ८५० कॅन्सरग्रस्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक या उपक्रमाचा लाभ घेतील. प्रत्येक रुग्णाला ३ किलो तांदूळ, अर्धा किलो तूरडाळ, पाव किलो खजूर, अर्धा किलो रवा, पाव किलो चहा पावडर, बिस्किटचा पुडा व राजगिरी चिक्की देण्यात येईल. या उपक्रमासाठी प्रत्येक रुग्णामागे रुपये ५०० खर्च अपेक्षित आहे.
संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे की दानशूर व्यक्तींनी आपल्या स्वर्गवासी आप्तजनांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या अन्नदानात सहभागी व्हावे. इच्छुकांनी आपल्या तिथीला प्रत्यक्ष उपस्थित राहून रुग्णांना स्वहस्ते शिधा द्यावा. तसेच आर्थिक वा वस्तुरूपाने देणगी देऊन या ईश्वरी कार्यात हातभार लावावा, असे आवाहन “स्वामी” परिवाराने केले आहे.
देणगीसाठी संपर्क क्रमांक ८९२८०६१३९१ असून (वेळ सकाळी १०.०० ते १२.०० व संध्याकाळी ६.०० ते ८.००), बँक तपशील : Account Name: SWAMEE Social Workers Association, Bank of Baroda – Parel Branch, S/Account No: 99350100001251 IFSC Code: BARB0DBPARE ई-मेल : Swamee2016@gmail.com, वेबसाइट : www.swamee_ngo.com व फेसबुक : swameengo.com.