वाशी विभागीय बोर्डात उत्साहात वृक्षारोपण; ‘प्लास्टिकमुक्ती’चा संदेश
निसर्गप्रेमी संस्था कामोठे यांच्या पुढाकाराने पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम
नवी मुंबई (मंगेश जाधव): निसर्गप्रेमी संस्था कामोठे यांच्या वतीने वाशी येथील मुंबई विभागीय बोर्ड कार्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सीबीडी बेलापूर येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. सुनील करपे (निसर्गप्रेमी) यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विभागीय बोर्डाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र अहिरे व सचिव सौ. ज्योत्स्ना शिंदे पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गानेही सक्रिय सहभाग घेत परिसर हरित करण्यासाठी झाडे लावली.
या वेळी सहाय्यक सचिव माधुरी पाटोळे, लेखाधिकारी सुर्वे मॅडम, शाखाधिकारी संजय कापसे, हेमलता बच्छाव, लक्ष्मण बोयवारे, ईडीपी मॅनेजर संजय नरोडे, तसेच भगवान चौरे, भादेकर, लटके, बागले, गायकवाड, दिघे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी नागरिक, विद्यार्थी व पालकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत “प्लास्टिकची नाते तोडा, निसर्गाशी नाते जोडा” हा संदेश दिला. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी व पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कॉलेजचे प्राचार्य श्री. आर. डी. पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.















