🔴
मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 2026’
🔵
सामाजिक कार्याची दखल; खेड येथे 26 एप्रिल रोजी होणार सन्मान सोहळा
📰 नवीमुंबई (मंगेश जाधव):
महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 2026 यंदा सामाजिक कार्यकर्ते आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनेलतर्फे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिला जातो.
मंडणगड तालुक्यातील आंबवणे खुर्द गावचे सुपुत्र असलेले अरविंद येलवे सध्या दैनिक सूर्योदयचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी मंडणगड-दापोली सामाजिक प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष तसेच मंडणगड तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा विशेष उल्लेखनीय मानला जातो. तसेच युवकांना संघटित करून विविध सामाजिक चळवळी उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
- या वर्षी 26 एप्रिल रोजी खेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर होत असलेला हा गौरव तालुक्यासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरत आहे.















