तळवली शाळेतील शिक्षकाचा मनमानी कारभार; निलंबनाऐवजी बदलीवरच समाधान
“अधिकारी खिशात आहेत” म्हणत धमक्या; गंभीर आरोपांनंतरही ठोस कारवाई नाही, पालक संतप्त
तळवली (प्रतिनिधी – मंगेश जाधव):
तालुक्यातील जि.प. पूर्व प्राथमिक मराठी शाळा तळवली नं. १ येथील शिक्षक श्री. एकनाथ जावरे यांच्या वर्तनाविरोधात पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. गंभीर गैरवर्तनाच्या तक्रारी करूनही शिक्षण विभागाकडून ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संबंधित शिक्षकावर सातत्याने उशिरा शाळेत येणे, अध्यापनाकडे दुर्लक्ष करणे, तसेच पालक व ग्रामस्थांशी अरेरावीची भाषा वापरण्याचे आरोप आहेत. एवढेच नव्हे तर “अधिकारी माझ्या खिशात आहेत” अशा प्रकारच्या उघड धमक्या देत दादागिरी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे शाळेतील वातावरण बिघडले असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
गंभीर प्रकार उघड
३० मार्च २०२६ रोजी पोषण आहार बनविणाऱ्या महिलेसोबत संबंधित शिक्षकाने वाद घालत अत्यंत आक्रमक वर्तन केले. यावेळी विद्यार्थ्यांसमोरच
“माझ्या कुटुंबीयांनी मला उलट बोलले असते तर कोयत्याने कापून टाकले असते”
असे धक्कादायक वक्तव्य केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले.
बैठकीतही दादागिरी
घटनेनंतर झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीतही शिक्षकाने उद्धट वर्तन कायम ठेवले. अधिकृत प्रोसिडिंग लिहिण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. तसेच सहाय्यक शिक्षिकेलाही नोंद न करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.
पालकांनी लेखी माफीची मागणी केल्यावर “तोंडी माफी मागितली आहे, लेखी कशाला?” असे म्हणत त्यांनी नकार दिला.
पालकांचा बहिष्काराचा इशारा
या सर्व प्रकारामुळे संतप्त पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला असून, गटशिक्षण अधिकारी व पंचायत समितीकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
चौकशी झाली; पण परिणाम नाही
६ एप्रिल रोजी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन चौकशी केली. मात्र संबंधित शिक्षकाने लेखी स्पष्टीकरण देण्यास नकार दिला. चौकशीनंतरही त्यांच्या वर्तनात कोणताही बदल दिसून आला नाही.
निलंबनाऐवजी बदलीवर नाराजी
यापूर्वीही संबंधित शिक्षकावर कारवाई झाल्याची माहिती समोर येत असताना, या गंभीर प्रकरणात निलंबनाऐवजी त्यांची बदली करण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“अशा प्रकारच्या वर्तनावर कठोर कारवाई न झाल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येईल,” अशी प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहे.















