नवी मुंबई विमानतळावर यलो फीव्हर लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी
परदेशात जाणाऱ्या सीफेरर्स, विद्यार्थी व कामगारांना होणार मोठा दिलासा
पनवेल (वार्ताहर) : परदेशात नोकरी, शिक्षण तसेच व्यावसायिक कारणांसाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे अधिकृत यलो फीव्हर लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया सीफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. युनियनचे अध्यक्ष यांनी नवी मुंबई महापौरांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, उरण परिसरात उभारण्यात येत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अर्थात भविष्यात आंतरराष्ट्रीय प्रवासाचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. या विमानतळामुळे मोठ्या प्रमाणात सीफेरर्स, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या कामगारांची ये-जा वाढणार आहे.
अनेक देशांच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांनुसार काही देशांमध्ये प्रवास करण्यासाठी यलो फीव्हर लसीकरण अनिवार्य आहे. मात्र, सध्या नवी मुंबई परिसरात अधिकृत यलो फीव्हर लसीकरण केंद्र उपलब्ध नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत हजारो सीफेरर्सना जहाजावर रुजू होण्यासाठी ही लस बंधनकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नवी मुंबई हे देशातील महत्त्वाचे मर्चंट नेव्ही आणि सागरी व्यवसाय केंद्र म्हणून विकसित होत असल्याने सार्वजनिक हित लक्षात घेऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर किंवा नवी मुंबई महानगरपालिकेच्या शासकीय रुग्णालयात अधिकृत यलो फीव्हर लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही सुविधा उपलब्ध झाल्यास सीफेरर्स, परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, आंतरराष्ट्रीय प्रवासी, परदेशात नोकरीसाठी जाणारे कामगार, व्यावसायिक आणि पर्यटक यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे संजय पवार यांनी सांगितले.














