कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाळ माने मैदानात
महायुतीत अनिकेत तटकरे यांचे नाव जवळपास निश्चित; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांवरून बाळ माने यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून माजी आमदार बाळ माने यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. एबी फॉर्म घेतल्यानंतर बाळ माने यांनी श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, महायुतीकडून अनिकेत तटकरे यांचे नाव जवळजवळ निश्चित मानले जात आहे. कोकणातील या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड मानले जात असले तरी आपण सक्षम पर्याय असल्याचा दावा बाळ माने यांनी केला आहे.
“आतापर्यंत निवडून आलेल्या आमदारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांसाठी ठोस काम केलेले नाही. स्थानिक प्रतिनिधींच्या अडचणी समजून घेण्याचा किंवा सोडवण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे मतदार यावेळी सक्षम पर्याय म्हणून आम्हाला संधी देतील,” असा विश्वास बाळ माने यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्ष म्हणून निवडणूक लढवणे आवश्यक असल्याचे एकमताने ठरवण्यात आले असून, त्यानुसार ही जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, महायुतीमध्ये अंतर्गत तडजोडीचा मोठा फॉर्म्युला ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. रायगडचे बहुप्रतिक्षित पालकमंत्रीपद शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना देण्यात येणार असून, त्याबदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीच्या मतदारसंख्येवर नजर टाकल्यास शिवसेनेकडे ३३४, भाजपकडे २६४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे १६५ मतदार असल्याचे समोर येते. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष लागले आहे.














