TWJ फाउंडेशनच्या वनराई बंधारा बांधण्याच्या संकल्पाला सुरुवात
तळवली (मंगेश जाधव)..
ग्रामीण भागातील शाश्वत अर्थव्यवस्था ही निसर्गावर आधारीत असून पाणी हा निसर्गातील महत्वाचा घटक आहे. पाणी जसे पिण्यासाठी महत्त्वाचे आहे तितकेच शेतीसाठी देखील महत्त्वाचे आहे. कोकणातील ओढे, परे, नद्या यामधील पाणी नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यापासून आटण्यास सुरुवात होते. त्यामुळे बऱ्याच गावात ग्रामस्थ नदी, ओढ्यांवर बंधारे बांधण्याचा प्रयत्न करता.
TWJ फाउंडेशन गेले 02 वर्षे वनराई बंधारे बांधण्याचे कार्य करून पाणी अडवा, पाणी जिरवा असा संदेश देत आहे त्यासाठी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांना बरोबर घेऊन गावात वनराई बंधारे बांधत आहे.
यावर्षी दिनांक 12 नोव्हेंबर 2024 या दिवशी कालुस्ते बु. गावापासून वनराई बंधारा बांधण्याची सुरुवात झाली. पूर्व सर्व्हे करून निश्चित केलेल्या जागेवरती बंधारा श्रमदानातून बांधण्यास सुरुवात झाली. सुरुवातील वाहून आलेला रेतीचा गाळ पिशव्यांमध्ये भरण्यात आला ज्यामुळे खोलीकरण झाले. त्यानंतर पिशव्या आणि प्लॅस्टिक कागदाचा उपयोग करून बंधारा बांधण्यात आला. हा बंधारा बांधण्यासाठी प्लॅस्टिकचा कागद घरडा फाउंडेशन ने उपलब्ध केला तसेच सिमेंट पिशव्या ग्रामपंचायत ने उपलब्ध केल्या आणि TWJ फाउंडेशन च्या मार्गदर्शनाने 12 फुटाचा बंधारा बांधण्यात आला.
या बंधाऱ्यामुळे शेजारील विहिरीची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल तसेच गावात दुग्ध व्यवसायिक करण्याऱ्या गाई गुरांना पाणी पिण्यासाठी आणि डुंबण्यासाठी सोय होणार आहे. त्याच बरोबर रब्बी हंगामातील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग होणार आहे.
TWJ फाउंडेशन, घरडा फाउंडेशन चे कार्यकर्ते आणि कालुस्ते बु. गावचे ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून बंधारा उभा करण्यात आला. या कार्याला कालुस्ते बु. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांचे उत्तम सहकार्य मिळाले.