अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी तरुणावर पोक्सो गुन्हा दाखल.

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी तुळसणी येथील रासिक कासम बोट या २४ वर्षीय तरुणावर सोमवारी पोक्सो अंतर्गत देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे..
या बाबत देवरुख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रासिक हा गेली दीड वर्षे एका गावातील अल्पवयीन मुलीला दूरध्वनी करून, पाठलाग करणे तसेच प्रत्यक्ष भेटून नाहक त्रास देत होता. या प्रकरणी रासिक याला समज देखील देण्यात आली होती. मात्र रासिक याच्या वागण्यात कोणतीच सुधारणा झाली नाही. अखेर रासिक याच्या त्रासाला कंटाळून या मुलीने सोमवारी देवरूख पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. या मुलीचे नातेवाईक आक्रमक झाले होते.
दिलेल्या फिर्यादीनुसार, रासिक बोट याला तत्काळ देवरूख पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक यशवंत केडगे यांनी देवरूख पोलीस ठाण्याला भेट दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक यशवंत केडगे, पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शबनम मुजावर करत आहेत.