. विजय वडवेराव यांच्या नेतृत्वाखाली
पुण्यात फुले फेस्टिवल उत्साहात संपन्न.
सहाशे कवींचा उत्स्फूर्त सहभाग

पुण्यात फुले फेस्टिवल उत्साहात संपन्न.
नवी मुंबई (मंगेश जाधव)
येथील एस एम जोशी सभागृह, गाजवे चौक, नवी पेठ पुणे येथे दि २ ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान चार दिवस चाललेला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल सुमारे सहाशे कविंच्या उत्स्फूर्त उपस्थितीत तसेच आयोजक विजय वडवेराव यांच्या एक हाती नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात व दिमाखदार पध्दतीने संपन्न झाला.
या महोत्सवात सहाशे कवींपैकी दिडशे कवी रोज व दहा ते बारा गट करुन नियोजनपूर्वक प्रत्येक गट एका वेळी मंचावर बसवून त्यांच्याच अध्यक्षतेखाली कविता सादर होत असंत. सर्व कवयित्री सावित्रीमाई ची तर सर्व कवी सफेद सदरा पायजमा पोषाखात कविता सादर करत होते. प्रत्येक कविता मनाला उभारी देणारी व प्रभावित करणारी असायची. चारही दिवस मी उपस्थित असल्याने मला हे सर्व प्रत्यक्ष अनुभवता आले. विजय वडवेराव हे पुणे जिल्ह्यातील जि.प. शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. आंबेडकरी चळवळीतील शिव,फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे खंदे समर्थक असून भ. बुध्दाचे ते अनुयायी आहेत हे ते अभिमानाने सांगतात. पडझड झालेला भिडेवाडा दृष्टीस पडल्यावर त्यांचे मन गहिवरले आणि त्यांच्या लेखणीतून शब्द उमटले
“मी बोलताच त्याने हंबरडा फोडला,भिडेवाडा बोलला”
त्या नंतर त्यांनी अनेक जिल्ह्यांत जाऊन”भिडे वाड्यातील मुलींची पहिली शाळा” या विषयावर कवी संमेलने घेतली. या अभियानात त्यांना काही सच्चे फुलेप्रेमी कवी लाभले. त्या सर्वांना घेऊन त्यांनी पुण्यात याच विषयावर कवी संमेलन, चर्चासत्र, एक पात्री, समुह गीत, पोवाडा, दांडपट्टा, लाठीकाठी प्रात्यक्षिक अशा विविध उपक्रमांचा समावेश करुन “आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल २०२५” आयोजन करुन ते यशस्वी करुन दाखवले. याचे संपूर्ण श्रेय फुले प्रेमी विजय वडवेराव यांचेच आहे.
या चार दिवसांच्या कालावधीत उपस्थित सर्व कवी व कला रसिकांसाठी चहा, नाश्ता, दुपारचे स्वादिष्ट जेवण मोफत दिले गेले. कविता व अन्य कला आविष्कार सादर करणाऱ्या प्रत्येकाला आकर्षक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भारतीय संविधान देऊन गौरविले. शिवाय उपस्थितांमधून पंचवीस व्यक्तीना “आंतरराष्ट्रीय समाज सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. या महोत्सवासाठीचा संपूर्ण खर्च स्वतः विजय वडवेराव यांनी केले आहे. अनेकांनी त्यांना मदत देऊ केले परंतु त्यांनी नम्रपणे ती नाकारली हे विशेष.
विजय वडवेराव यांच्या मुळे अनेकांना फुलेप्रेमी म्हणून मिरवता आली. चार भिंतींच्या आत बंदिस्त स्त्रिया व मुलींना पुण्यात ज्या भिडेवाड्यात सावित्रीमाईंच्या साथीने महात्मा ज्योतिराव फुलेनी देशातील मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. तत्कालीन समाजव्यवस्थेचा विरोध पत्करून शिक्षण प्रसाराचे कार्य करणारे फुले दुर्लक्षित राहिले. तो ऐतिहासिक भिडे वाडा पडला आहे. तेथे भव्यदिव्य स्मारक व्हावे अशी इच्छा व्यक्त करतांनाच क्रा़तीसूर्य म. फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांना अजुनही “भारतरत्न पुरस्कार मिळाला नसल्याची खंतही व्यक्त केली.
गेल्या काही वर्षांत न थकता न कंटाळता सतत संविधान दूत बनून संविधानाची ओळख तळागाळातील लोक तसेच विद्यार्थीना व्हावा यासाठी स्व खर्चाने जनजागृती करणारे जि प चे शिक्षक विजय वडवेराव यांनी पुण्यात आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल देखील स्वखर्चाने व एक हाती नियोजन करुन व त्यांच्याच नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पार पाडले आहे. पुण्यात फुले जिंकले याचा त्यांना अभिमान वाटतो आहे. त्यांच्या या उत्तुंग कामगिरीची दखल समाज माध्यमातून व शासनदरबारी नक्कीच घेतली जाईल असा विश्वास आम्हा सर्व फुलेप्रेमींना वाटतो.