महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !!

एका वाघाची किंमत सध्याच्या परिस्थितीत किमान २५ लाख रुपये आहे.

नागपूर :– दहा वर्षांपूर्वी राज्यात अवघ्या तीन महिन्यात एक नाही तर तब्बल १९-२० वाघांची शिकार करणाऱ्या मध्यप्रदेशातील बहेलिया शिकाऱ्यांचा पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे.

या शिकारी जमातीचा म्होरक्या अजित राजगोंड याला महाराष्ट्र वनविभागाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर राज्याला “रेड अलर्ट” देण्यात आला आहे.

२०१३ ते २०१६ यादरम्यान काय घडले?

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातून वाघांच्या शिकारीचे सत्र उघडकीस आले. घटांग येथून झालेल्या वाघाच्या शिकार प्रकरणात शिकाऱ्यांना अटक करण्यात आली.

त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात एक नाही तर तब्बल १९ वाघांची शिकार केल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले, पण त्यावेळी यापेक्षाही अधिक वाघांची शिकार झाल्याचे वाघांचे संरक्षक सांगत होते. तर वनखात्यातील काही अधिकाऱ्यांनीसुद्धा याला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला.

त्यावेळी याप्रकरणात सुमारे १५० शिकारी व आरोपींना अटक करण्यात आली. हे सर्व शिकारी मध्यप्रदेशातील वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया शिकारी गॅंगमधील असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणाचा पाठपुरावा करून आरोपींना अटक करण्यात त्यावेळी स्थापन झालेल्या मेळघाट वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली.

शिक्षण मंडळाच्या सर्व परीक्षांवर बहिष्कार, आयएएस अधिकाऱ्यांना परीक्षा समजतात काय? शिक्षकांचा थेट सवाल…

अजितच्या अटकेचा इतिहास काय ?

अजित, केरू आणि कुट्टू हे तीनही सख्खे भाऊ वाघांच्या शिकारीत तरबेज होते. अजित हा त्यावेळी नागपूर आणि परिसरात झालेल्या वाघाच्या शिकारीत “मोस्ट वॉन्टेड” होता. वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोला माहिती दिल्यानंतर २०१४-१५ मध्ये त्याला तिरुपती येथून अटक करण्यात आली. हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. अजितला याप्रकरणात शिक्षा झाली. ही शिक्षा पूर्ण करून तो बाहेर पडला.

त्यानंतर अजितला १८ जुलै २०२४ ला मध्यप्रदेश वनखात्याने अटक केली. सप्टेंबर २०२४ मध्ये तो जामिनावर बाहेर आला. आता २५ जानेवारीला महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे महाराष्ट्र वनविभागाने त्याला ताब्यात घेतले.

अजित, केरू, कुट्टू हे कोण?

अजित, केरू, कुट्टू हे तिघेही सख्खे भाऊ असून तिघेही वाघांच्या शिकारीत तरबेज होते. मध्यप्रदेशातील कटनी येथून केरुच्या अटकेसाठी गेलेल्या वनाधिकाऱ्यांना केरू सापडला नाही, पण कुट्टू हाती लागला. केरुची बायकोदेखील या शिकार प्रकरणात सामील होती.

अजित, कुट्टू यांना अटक करण्यात यश आले, पण केरू शेवटपर्यंत वनखात्यातील अधिकाऱ्यांच्या हाती लागला नाही. “राष्ट्रपती” या नावाने प्रसिद्ध असलेल्या वाघाची शिकार पवनी डॅम परिसरात केरूने केली होती.

अजितला ताब्यात घेतल्यानंतर काय घडले?

अजितला शनिवारी राजुरा येथे महाराष्ट्र वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर दिवसभर त्याची चौकशी सुरू होती. यादरम्यान त्याच्या मोबाईलवरून २० लाखाचा आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले.

हा व्यवहार वाघांच्या संदर्भातील असेल तर किमान चार ते पाच वाघांची शिकार निश्चित असल्याचा अंदाज आहे. अजितला आज रविवारी अटक दाखवण्याची शक्यता आहे.

वाघांच्या अवयवांची किंमत किती?

२०१२-१३ साली वाघाच्या कातडीसाठी सुमारे पाच लाख रुपये आकारले जात होते. या दहा वर्षांत ही किंमत दुप्पट झाली आहे. वाघाच्या कातडीसाठी १५ लाख रुपये आकारले जात आहे. तर हाडांसाठी १२ ते १५ लाख रुपये आकारले जात आहे.

त्यामुळे एका वाघाची किंमत सध्याच्या परिस्थितीत किमान २५ लाख रुपये आहे.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...