छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा -अफसाना मुल्ला
गुहागर -महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदृष्टी असणारे व शून्यातून विश्व निर्माण करणारे राष्ट्रपुरुष होते ,त्यांच्या कार्यापासून विद्यार्थ्यांनी स्फूर्ती घ्यावी व विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे प्रतिपादन वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये संपन्न झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून अफसाना मुल्ला यांनी केले.जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती अनेक उपक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात आली.त्यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर कोळथरकर, सामाजिक कार्यकर्ते उदय रोहीलकर ,मुख्याध्यापक मनोज पाटील ,अंगणवाडी सेविका मत्स्यगंधा कोळथरकर, सोनिया नाटेकर, अंजली मुद्दमवार ,सुषमा गायकवाड ,धन्वंतरी मोरे ,अर्णवी नाटेकर, संस्कार रोहीलकर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यावेळी विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ यांची भाषणे झाली
.विद्यार्थ्यांनी विविध स्फूर्तीदायक गीते व पोवाडे यांच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली .प्रमुख पाहुणे श्री शंकर कोळथरकर म्हणाले की शिवाजी महाराज हे युगपुरुष होते ,शिवाजी महाराजांच्या आरमारांमध्ये व स्वराज्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक होते ,शिवाजी महाराज हे प्रजाहितदक्ष राजे होते, स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी ते सर्वसामान्य मावळ्यांच्या जीवावर पूर्ण केले .
मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील विविध प्रसंग सादर केले.त्यावेळी धन्वंतरी मोरे ,सुषमा गायकवाड व मान्यवरांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे अप्रतिम असे सूत्रसंचालन शिक्षिका अंजली मुद्दमवार यांनी केले.आभार प्रदर्शन सुषमा गायकवाड यांनी केले.