गुहागर बस डेपोच्या अनियमित बससेवेचा प्रवासी आणि विद्यार्थ्यांना फटका.
गुहागर बस डेपोच्या अनियमित बससेवेचा प्रवासी आणि विद्यार्थ्यांना फटका
आबलोली:
गेल्या काही दिवसांपासून गुहागर बस डेपोच्या अनियमित बससेवेचा फटका सर्वसामान्य प्रवासी आणि विद्यार्थ्यांना बसत आहे. एसटी फेऱ्यांच्या वेळापत्रकातील अनिश्चितता, अचानक फेऱ्या रद्द होणे, तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता प्रवाशांना अडचणीत टाकणे, हा प्रकार वारंवार घडताना दिसतो.
आज, दिनांक 20 फेब्रुवारी, पडवे येथील प्रवासी अभय गडदे यांना अशाच प्रकाराचा अनुभव आला. नेहमी सकाळी ६ वाजून २०मिनिटाने कुंडली बंदर इथून निघणारी शृंगारतळीमार्गे चिपळूण ला जाणारी एसटी बस अचानक रद्द करण्यात आली. परंतु त्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक प्रवासी बसस्थानकावर गाडीची वाट पाहत उभे राहिले आणि शेवटी फेरी रद्द झाल्याचे समजल्यानंतर त्यांना मनःस्ताप सहन करावा लागला.
या घटनेचा फटका अनुष्का गडदे हिला बसला, जी सध्या बारावीच्या परीक्षेसाठी चिपळूण येथे जाते. आज तिचा अत्यंत महत्त्वाचा केमेस्ट्रीचा पेपर होता. अचानक बस रद्द झाल्याने तिच्या पालकांना खाजगी वाहनाची व्यवस्था करावी लागली आणि मोठ्या खर्चानं आणि त्रासानं अखेर त्यांनी चिपळूण गाठावे लागले तरी याबाबत संबंधित अधिकार्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी असे हि त्यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
यासोबतच, पडवे गावामधील प्रवासी वर्गालाही सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पडवे एसटी फेरी तवसाळ फाट्यावर थांबते, ज्यामुळे प्रवाशांना पायी मोठा प्रवास करावा लागतो किंवा पर्यायी वाहनांची व्यवस्था करावी लागते.
या प्रकारावर अभय गडदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी आणि फेऱ्यांचे वेळापत्रक नियमित करावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ लक्षात घेता, वेळेवर आणि विश्वासार्ह बससेवा पुरवणे हे एसटी प्रशासनाचे कर्तव्य आहे. या अनियमिततेमुळे प्रवाशांना त्रास होणार नाही, यासाठी प्रशासनाने तत्काळ लक्ष घालावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
गुहागर बस स्थानकाचा हा गलथान कारभार आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सहनशीलतेची परीक्षा लवकरच थांबली पाहिजे. – संतप्त प्रवासी.