राज्यस्तरीय १२ वी ऊस परिषद २८ फेब्रुवारी रोजी सांगलीत
नंदकुमार बागडेपाटील
सांगली : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ व मासिक ऊस संदेश यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय “१२ वी ऊस परिषद” शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जनाई गार्डन, पेठ, शिराळा रोड, ता. वाळवा, जि. सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेची माहिती संघाच्या परिषद संयोजक समितीचे अध्यक्ष श्री. युवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ऊस शेतीच्या वाढत्या समस्यांवर चर्चा
सध्याच्या परिस्थितीत ऊस शेती संकटात असून शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या समस्यांवर ठोस उपाय शोधण्यासाठी तज्ज्ञ, ऊस उत्पादक व उद्योग क्षेत्रातील जाणकार यांना एकत्र आणून विचारमंथन करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख मान्यवरांचा उपस्थिती
या परिषदेचे उद्घाटन शेतकरी नेते मा. श्री. रघुनाथ दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. किरणभाऊ चव्हाण (संस्थापक अध्यक्ष, केळी उत्पादक शेतकरी संघ) असतील. तसेच परिषदेसाठी मा. श्री. अतुलनाना माने पाटील (संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ) हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ऊस शेतीतील नव्या तंत्रज्ञानावर मार्गदर्शन
सद्यस्थितीत ऊस शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीच्या उपाययोजनांवर या परिषदेत सखोल चर्चा केली जाईल.
श्री. सुरेश उबाळे (ऊस पैदासकार, पाडेगाव ऊस संशोधन केंद्र) “उद्दीष्ट एकरी १०० टनाचे” या विषयावर मार्गदर्शन करतील.
श्री. शामकांत पाटील (महाराष्ट्र प्रमुख, जैन इरिगेशन लि.) “ऊस पीक पाणी व्यवस्थापन” या महत्त्वाच्या विषयावर शेतकऱ्यांना दिशा देतील.
या परिषदेमुळे ऊस उत्पादकांना मार्गदर्शन मिळेल आणि ऊस शेतीत नवे तंत्रज्ञान व आधुनिक उपाययोजना अंमलात आणण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील सर्व ऊस उत्पादक, संशोधक आणि उद्योजकांनी या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून
करण्यात आले आहे.