“त्या मुर्खाला यूपीत पाठवा, आम्ही उपचार करू!” – अबु आझमींच्या वक्तव्यावर योगी आदित्यनाथ संतापले
लखनौ: समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी औरंगजेबाच्या स्तुतीसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र विधानसभेत त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला असून, या विधानाचे पडसाद उत्तर प्रदेशपर्यंतही उमटले आहेत.
उत्तर प्रदेश विधान परिषदेत या मुद्द्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतापले आणि समाजवादी पक्षावर तीव्र हल्लाबोल केला. “समाजवादी पक्षाचा एक नेता औरंगजेबाला आदर्श मानतो. त्या मूर्खाला जर औरंगजेब चांगला वाटतो, तर समाजवादी पक्षाने त्याला पक्षातून बाहेर हाकलावे. अशा लोकांना उत्तर प्रदेशात पाठवा, आम्ही योग्य उपचार करू. येथे अशा लोकांवर उपचार करण्यास वेळ लागत नाही!” असे योगी आदित्यनाथ यांनी ठणकावले.
“समाजवादी पक्षाचा हिरो औरंगजेब?”
योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाची विचारधारा आणि त्यांचे नेते यांच्यावरही टीका केली. “समाजवादी पक्षाला भारतीय वारशाचा अभिमान नाही. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी भारतीय संस्कृतीचा आधार भगवान राम, कृष्ण आणि शंकर हे आहेत, असे सांगितले होते. मात्र, आजचा समाजवादी पक्ष त्याच विचारांपासून दूर गेला आहे आणि औरंगजेबाला आदर्श मानतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
इतकेच नव्हे, तर त्यांनी औरंगजेबाचा इतिहास उलगडत सांगितले, “औरंगजेबाच्या वडिलांनीही त्याला स्वीकारले नव्हते. शाहजहानने स्वतः लिहून ठेवले होते, ‘खुदा करे ऐसी औलाद किसी को न दे’. औरंगजेब भारताच्या आस्थेवर प्रहार करण्यासाठी आला होता आणि इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. सभ्य माणूस आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
या प्रकरणानंतर समाजवादी पक्षाकडून कोणतेही अधिकृत प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. मात्र, योगी आदित्यनाथ यांच्या टीकेनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.