पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील अठराव्या सामन्यात गट अ मध्ये भारताने नामिबियावर ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने २० षटकांत ९ गडी गमावून २०९ धावांचा भक्कम डोंगर उभारला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे नामिबियाचा डाव १८.२ षटकांत ११६ धावांत संपुष्टात आला.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताने आक्रमक सुरुवात केली. इशान किशनने अवघ्या २४ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची तुफानी खेळी साकारली. संजू सॅमसनने ८ चेंडूंमध्ये २२ धावा जोडत झपाट्याने धावसंख्या वाढवली. तिलक वर्माने २५, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने १२ धावांचे योगदान दिले.

मधल्या फळीत हार्दिक पांड्याने आक्रमक फलंदाजी करत २८ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या. शिवम दुबेने २३ धावा जोडल्या. अखेरच्या षटकांत धावगती कायम राहिल्याने भारताला २०९ धावांचा मजबूत स्कोअर उभारता आला. नामिबियाकडून गेरहार्ड एरास्मसने ४ बळी घेत प्रभावी गोलंदाजी केली.

२१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाची फलंदाजी सुरुवातीपासूनच दबावाखाली राहिली. लॉरेन स्टीनकॅम्पने २९, तर जान फ्रायलिंकने २२ धावा केल्या. कर्णधार गेरहार्ड एरास्मसने १८ धावांची झुंज दिली. मात्र अन्य फलंदाज अपयशी ठरले.

भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत नामिबियाला सावरू दिले नाही. वरुण चक्रवर्तीने ३ बळी घेत डाव मोडीत काढला. अक्षर पटेलने २, हार्दिक पांड्याने २, तर जसप्रीत बुमराह, शिवम दुबे आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

अष्टपैलू कामगिरीसाठी हार्दिक पांड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह भारताने गट अ मधील आपली स्थिती अधिक भक्कम करत स्पर्धेतील विजेतेपदाच्या शर्यतीत मजबूत दावेदारी सिद्ध केली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]