कुणकेश्वर – गणपतीपुळे एस.टी. अचानक बंद; प्रवाशांचे अतोनात हाल
रत्नागिरी आगाराने गाडी तात्काळ सुरू करावी – पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप शेमणकर यांची मागणी
राजापूर – संदीप शेमणकर
सिंधुदुर्गातील कुणकेश्वर ते रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे या दोन प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना जोडणारी राज्य परिवहन महामंडळाची कुणकेश्वर – गणपतीपुळे ही थेट एस.टी. बस सेवा १५ जूनपासून अचानक बंद करण्यात आल्याने प्रवासी व भाविकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नागिरी आगारामार्फत गेल्या पाच वर्षांपासून ही बस सेवा चांगल्या प्रवासी भारमानासह सुरू होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापासून गणपतीपुळे या जागृत देवस्थानापर्यंत थेट प्रवासाची सुविधा या गाडीमुळे उपलब्ध झाली होती. त्यामुळे भाविकांना एका दिवसात दोन्ही तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेणे सोयीचे होत होते.
या मार्गावर देवगड, जामसांडे, पडेल, सागवे, जैतापूर, नाटे, आडिवरे, गावखडी आणि पावस या परिसरातील नागरिक व प्रवासी मोठ्या प्रमाणावर या सेवेचा लाभ घेत होते. तसेच कात्रादेवी मंदिर, आडिवरेची महाकाली देवी आणि पावस येथील स्वामी स्वरूपानंद मंदिर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठीही ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत होती.
विशेष म्हणजे, या वेळेत पर्यायी बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसह नोकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कोणतेही स्पष्ट कारण न देता ही सेवा बंद करण्यात आल्याने रत्नागिरी आगाराच्या कारभाराविरोधात प्रवाश्यांनी संताप व्यक्त केला आहे.
पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप शेमणकर यांनी रत्नागिरी एस.टी. आगार प्रशासनाकडे तातडीने लक्ष देऊन कुणकेश्वर – गणपतीपुळे ही बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी कोकणातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या बससेवा कायम ठेवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
“भाविक, पर्यटक आणि सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता रत्नागिरी आगाराने ही बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करावी,” अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे.













