पाणीपट्टी वाढीचा जाब विचारताच कदमवाडी नळपाणी योजनेचा पाणीपुरवठा बंद; ‘जन आंदोलन मंच’च्या तक्रारी नंतर अखेर पाणी पूर्ववत
*रत्नागिरी प्रतिनिधी : निलेश रहाटे
घाटीवळे ग्रामपंचायत अंतर्गत कदमवाडी नळपाणी पुरवठा योजनेच्या पाणीपट्टीत सुमारे ६६ टक्के वाढ का करण्यात आली आणि आर्थिक हिशोब द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केल्यानंतर कथित पाणी समितीने वाडीचा पाणीपुरवठा बंद केल्याचा प्रकार झाला होता.
या प्रकारामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला. त्यानंतर जन आंदोलन मंच, घाटीवळेचे अध्यक्ष नंदकुमार काशीराम डोळस यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती संगमेश्वर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली. प्रशासनाने दखल घेत ग्रामविस्तार अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार २३ जून २०२६ रोजी पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.
मात्र, ग्रामस्थांनी कथित पाणी समितीचे कायदेशीर अस्तित्व, ग्रामपंचायतीचा ठराव, करारनामा, आर्थिक व्यवहार आणि पाणीपट्टी वाढीची चौकशी करून स्वतंत्र लेखापरीक्षण (ऑडिट) करावे, अशी मागणी कायम ठेवली आहे. तसेच, सार्वजनिक पाणीपुरवठा बंद करून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर फौजदारी कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात प्रशासन पुढे काय कारवाई करते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.













