भोके मायंगडेवाडी शाळेला जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शाळा’ पुरस्कार
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा केंद्रातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भोके मायंगडेवाडी हिने शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक बांधिलकी आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचा प्रतिष्ठेचा ‘आदर्श शाळा’ पुरस्कार पटकावला आहे.
या मानाच्या पुरस्काराचे वितरण १३ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी येथे आयोजित ‘ज्ञानभाव’ समारंभात राज्याचे पालकमंत्री तथा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा आस्माताई काझी, मुख्य कार्यकारी अधिकारी वेदेही रानडे, आमदार किरण सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चालके, शिक्षण समितीचे सभापती नंदकुमार बुरूक तसेच शिक्षणाधिकारी श्रीमती शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेने गेल्या वर्षभरात सुमारे सात लाख रुपयांचा शैक्षणिक विकास निधी उभारून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, विविध शैक्षणिक वस्तूंची उपलब्धता, शाळेचा आकर्षक परिसर, रंगरंगोटी, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा आणि सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या उपक्रमांमुळे शाळेने सर्वांगीण प्रगती साधली. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा परिषदेकडून शाळेला हा बहुमान प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्यास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अर्चना मायंगडे, श्रीपती मायंगडे, विजय खांबळे, पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक माजिद देसाई तसेच शिक्षिका सौ. शैलजा केंकळ, सौ. वैशाली कुडाळकर आणि सौ. श्रद्धा मोहिते यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन, मेहनत आणि नियोजनामुळे शाळेला हा बहुमान मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि पालकवर्ग यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, भविष्यातही शाळा अशीच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.






