गुहागर गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन; मासू ग्रामपंचायतीच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरपासून आनंद भोजने यांचे आमरण उपोषण
गुहागर : मासू ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामाचा प्रश्न, ग्रामपंचायत हद्दीतील अपूर्ण विकासकामे तसेच मासू खुर्द येथील नळपाणी योजनेतून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याच्या प्रश्नांवर न्याय मिळावा, या मागणीसाठी शिवस्वराज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भोजने यांनी गुहागरच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
या प्रश्नांसाठी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पंचायत समिती गुहागर कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. आता १६ नोव्हेंबर २०२६ रोजी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
मासू ग्रामपंचायतीच्या इमारतीचे बांधकाम, ग्रामपंचायत हद्दीतील अर्धवट राहिलेली तसेच कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असलेली विकासकामे आणि मासू खुर्द येथील नळपाणी योजनेतून ग्रामस्थांना नियमित पाणी मिळत नसल्याचा मुद्दा निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
पाणी हा नागरिकांच्या जीवनाशी निगडित मूलभूत प्रश्न असून, संबंधित समस्यांवर तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी आनंद भोजने यांनी केली आहे. या निवेदनाची नोंद घेऊन संबंधित प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
— रत्नागिरी वार्ताहर












