अधिकारी पैसे मागतअसतील तर आयुक्तांना करा ई-मेल
पारदर्शी कारभारासाठी महापालिकेचा पुढाकार आयुक्त ओम्बासे एक्शन मोडवर
सोलापूर (नंदकुमार बागडेपाटील प्रतिनिधी) महापालिकेतील कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी, भ्रष्ट कारभाराला आळा घालण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी झाल्यास नागरिक आता थेट आयुक्तांकडे तक्रार करू शकतात. भ्रष्ट कारभाराला आळा घालण्यासाठी आयुक्तांनी स्वतंत्र ई-मेल आयडी commissioner.solapurmc@ gmail.com हा उपलब्ध करून देत सर्वसामान्य सोलापूरकरांना दिलासा दिला आहे.
सोलापूर महापालिकेत सर्वसामान्यांना सेवा पुरविण्यासाठी विविध कार्यालये कार्यरत आहेत. प्रामुख्याने बांधकाम, जन्म-मृत्यू, नगररचना, कर विभागामध्ये नागरिकांची
वर्दळ अधिक असते. या विभागांसह इतर कोणत्याही विभागांमध्ये विविध टप्प्यांवर काम चालते. अशाप्रसंगी नागरिकांचा कामासाठी शासकीय कर्मचारी, एजंट आणि खासगी व्यक्ती यांच्याशी संबंध येतो. कामासाठी पैशाची मागणी केली जाते. प्रत्येक कामासाठी कायदे, नियम हे स्पष्ट आहेत. त्यामुळे नागरिकांनी कामासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना पैसे देण्याची गरज नाही. कामकाजामध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी सर्व सेवा या ऑनलाइन आहेत. तसेच शहरातील समस्या मांडण्यासाठी परिवर्तन अॅप, आपले सरकार आदी ऑनलाइन अॅप कार्यान्वित आहेत. परंतु नागरिकांकडून महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून पैशाची मागणी करत भ्रष्ट कारभार होत असल्याची निदर्शनास आल्यास त्या तक्रारीसाठी commissioner.solapurmc@ gmail.com हा ई-मेल आयडी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी नागरिकांनी भ्रष्टाचाराला आळा बसविण्यासाठी व प्रशासकीय कामकाज सुलभ आणि पारदर्शक होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.