राजापूर आगारातील एसटी बस वाहक श्री. विजय जाधव यांचा प्रामाणिकपणा
✍️ श्री.राजू सागवेकर | राजापूर
आजच्या काळात, जिथे स्वार्थ, फसवणूक आणि बेफिकीरी रोजच्याच बाबी झाल्या आहेत, तिथे राजापूर एसटी आगारातील बस वाहक श्री. विजय जाधव यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा आणि सजगता समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.
राजापूर आगारातून दुपारी ११.१५ वाजता सुटणाऱ्या राजापूर-जैतापूर (टपाल) एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचे पाकीट बसमध्ये पडले. हे पाकीट बस वाहक श्री. विजय जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ ते उचलले आणि त्यातील कागदपत्रे, पाकीट तपासून प्रवाशाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला.पाकिटातील फोटोवरून सदर प्रवासी कोंबे स्टॉप येथे उतरल्याची माहिती मिळाल्यावर, जाधव यांनी बस जैतापूरवरून परतताना कोंबे स्टॉप येथे बस थांबवून चौकशी केली. पाकिटातील फोटोच्या आधारे श्री. राजू सागवेकर व रविंद्र (बब्या) कातकर यांनी सदर प्रवासी साखर गावातील घाडी गुरव वाडीतील श्री. रमेश गुरव असल्याचे ओळखले.
श्री.राजू सागवेकर व श्री.बब्या कातकर यांनी पाकीट ताब्यात घेत श्री. गुरव यांच्याकडे सुरक्षितपणे पोहोचवण्याचे आश्वासन दिले. विजय जाधव यांच्या सजगतेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे रमेश गुरव यांना त्यांचे संपूर्ण पाकीट, त्यातील वस्तूंसह परत मिळाले.
श्री.विजय जाधव यांची ही कृती केवळ एक कर्मचाऱ्याची जबाबदारी नव्हे, तर एक सजग आणि नितीमूल्यांची जपणूक करणाऱ्या नागरिकाची साक्ष आहे.
अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळेच एसटी विभागावर आजही सामान्य नागरिकांचा विश्वास टिकून आहे.
समाजात माणुसकी आणि प्रामाणिकतेचे जतन करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांचा सार्वजनिक सत्कार व गौरव होणे आवश्यक आहे, अशी सर्वसामान्य प्रवाशांची भावना आहे.
श्री. रमेश गुरव यांच्या ताब्यात पाकीट देताच त्यांनी बसवाहक श्री. विजय जाधव यांना खुप खुप धन्यवाद दिले..