आर्थिक परिस्थिती सुधारली की लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात आले. मात्र, निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या नेत्यांनी हा हफ्ता वाढवून 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याने सरकारवर जोरदार टीका होत आहे.
महिला दिनाच्या दिवशी (8 मार्च) 2100 रुपये मिळतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की, हा वाढीव हफ्ता कधी मिळणार? यावर आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.
“आर्थिक परिस्थिती सुधारली की 2100 रुपये मिळतील”
अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना अजित पवार म्हणाले, “लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आम्ही नाकारलेले नाही. मात्र, राज्याची आर्थिक परिस्थिती पाहूनच आम्ही निर्णय घेऊ. सध्या आम्ही 1500 रुपये देत आहोत, आणि आमची परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये देऊ. सर्व सोंग आणता येतात, पण पैशांचे सोंग आणता येत नाही.”
महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यास हा हफ्ता 1500 वरून 2100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासन निवडणुकीच्या वेळी दिले गेले होते. मात्र, 10 मार्च रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या निधीवाढीबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती.
महिलांचे वाढते प्रश्न अनिश्चित उत्तर
महिला मतदारांमध्ये या विषयावर मोठी उत्सुकता आहे. सरकारकडून 2100 रुपयांचा हफ्ता कधी मिळणार, याबाबत स्पष्ट निर्णय घेतला जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच हा हफ्ता वाढेल, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महिलांना प्रत्यक्ष वाढीव रक्कम कधी मिळणार, याचा निर्णय भविष्यातच होईल.