नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसला जनरल डबे वाढवावेत – पराग कांबळे
बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
आबलोली (संदेश कदम) – कोकणातून मुंबईला आणि परत येणाऱ्या मत्स्यगंधा व नेत्रावती एक्सप्रेस या गाड्यांना मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत असून, या दोन्ही गाड्यांना अधिक जनरल डबे जोडण्याची मागणी बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि प्रवासी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे यांनी केली आहे.
कोकणातील प्रवाशांचा होतोय मनःस्ताप
कोकणातील नागरिक प्रामुख्याने रोजगार, नोकरी आणि व्यवसायानिमित्त मुंबईला सतत प्रवास करीत असतात. मात्र, कोकण रेल्वेच्या जनरल डब्यांत जागा कमी आणि गर्दी जास्त असल्याने अनेक प्रवासी मत्स्यगंधा आणि नेत्रावती एक्स्प्रेसमध्ये तात्काळ तिकीट काढून प्रवास करतात. परंतु या गाड्यांचे जनरल डबे कमी असल्याने प्रवाशांना चेंगराचेंगरीला सामोरे जावे लागत आहे.
प्रवाशांना जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी उपाययोजना गरजेच्या
गर्दीच्या वेळी अनेक प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतात. प्रवासादरम्यान अनेकदा अपघात व अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण होते. ही गंभीर स्थिती पाहता, रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे आणि जनरल डबे वाढवावेत अशी मागणी पराग कांबळे यांनी केली आहे.
रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी
कोकणातील प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने त्वरित मत्स्यगंधा आणि नेत्रावती एक्स्प्रेसमध्ये अधिक जनरल डबे जोडण्याची कार्यवाही करावी अन्यथा प्रवाशांच्या सोयीसाठी पुढील आंदोलनाचा विचार करण्यात येईल, असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.
——