अण्णा बनसोडे यांचा विधानसभा उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी २६ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जातीचे प्रतिनिधी आहेत. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती मानले जातात.
बिनविरोध निवडीची शक्यता
सध्या विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर, तर विधान परिषद सभापतीपदी भाजपचे राम शिंदे आहेत. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे कार्यरत आहेत. विधानसभा उपाध्यक्षपद महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याने अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता आहे.
निवडणूक २६ मार्च रोजी
विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया २६ मार्च २०२५ रोजी पार पडणार आहे. विरोधकांकडून उमेदवार न देण्याची शक्यता असल्याने बनसोडे यांची बिनविरोध निवड होऊ शकते.