चिपळूण तालुक्यातील खरवते – दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषि व कृषी संलग्न महाविद्यालयामध्ये जागतिक वन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा.
आबलोली (संदेश कदम)
चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि व कृषी संलग्न महाविद्यालय,खरवते-दहिवली आणि वन व पर्यावरण संवर्धनामध्ये अग्रेसर असणा-या अनुबंध चिपळूण या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये जागतिक वन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात नुकताच साजरा करण्यात आला. युवा पिढी मध्ये वन,पर्यावरण, जंगले, वन्य जीव,त्यांच्या दुर्मिळ प्रजाती यांविषयी रुची निर्माण व्हावी,त्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा या उद्देशातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील, अनुबंध संस्थेचे योगेश भागवत, श्रीराम खरे,डाॅ.सुनील भागवत, उद्योजक शैलेश टाकळे व सुधीर पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले व उपस्थित विद्यार्थ्यांना वनसंवर्धनाचा संदेश दिला. महाविद्यालयामधील जे विद्यार्थी वैयक्तिक पातळीवर पर्यावरण संवर्धन,समुपदेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांचा महाविद्यालय व अनुबंध संस्थेमार्फत रोख बक्षीस व रोपटे देवुन सन्मान करण्यात आला.या मध्ये कु.शुभम कारेकर, कु.अवनिष बर्डे (वाईल्ड फोटो ग्राफी),कु.दीप्ती वळंजु,कु.विजय रुपनवर (वक्तृत्व),कु.वैभव सोलनकर,कु.विजय ढेरे (वनसंवर्धन जनजागृतीपर लेख) कु.आदिती विश्वासराव,कु.आदिती गायकवाड (भित्तिपत्रक समुपदेशन) यांचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रम प्रसंगी वृक्ष हा पर्यावरण संतुलित करणारा महत्वाचा दुवा आहे, याचा आदर राखुन मान्यवर व विद्यार्थ्यांकडून ‘वृक्ष पुजन’ करण्यात आले,योगेश भागवत यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करून या उपक्रम मध्ये सहभागी माजी सर्व ज्येष्ठांचे योगदान व्यक्त केले व त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.या निमित्ताने “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे ” हा नारा देखील विद्यार्थ्यांकडून देण्यात आला. यावेळी महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारीवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विक्रांत साळवी व प्रा.सुशांत कदम यांनी केले तर आभार प्रा. प्रसाद साळुंके यांनी केले.