मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम: रत्नागिरी जिल्ह्याची १०० टक्के उद्दिष्ट्यपूर्ती, ८०८ नवउद्योजकांना मंजुरी.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम: रत्नागिरी जिल्ह्याची १०० टक्के उद्दिष्ट्यपूर्ती, ८०८ नवउद्योजकांना मंजुरी.

रत्नागिरी | राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत रत्नागिरी जिल्ह्याने १०० टक्के उद्दिष्ट्यपूर्ती केली आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा उद्योग केंद्राला ८०० प्रकरणांचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते, जे पूर्ण करण्यात आले आहे.

जिल्हा उद्योग केंद्राकडे एकूण २४४२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २२१६ अर्ज पात्र ठरले, आणि त्यापैकी ८०८ नवउद्योजकांची कर्जप्रकरणे मंजूर करून वित्तपुरवठा करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर यांनी दिली.

उद्दिष्ट्य पूर्तीसाठी प्रशासनाची भूमिका

योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करण्यात आले. अग्रणी बँक व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, विविध बँकांचे जिल्हा समन्वयक, शाखा व्यवस्थापक, तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून उद्दिष्ट्य साध्य केले.

बँकांचा सहभाग

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध बँकांनी सक्रिय सहभाग घेतला असून, प्रमुख बँकांच्या मंजूर प्रकरणांची संख्या पुढीलप्रमाणे आहे:

बँक ऑफ इंडिया – २२७; बँक ऑफ महाराष्ट्र – १३३: विदर्भ कोकण ग्रामीण बँक – १३३; कोटक महिंद्रा बँक – ८०, स्टेट बँक ऑफ इंडिया – ६०, युनियन बँक – ४७

तसेच इतर बँकांनीही उद्दिष्ट्यपूर्तीसाठी सहकार्य केले.

जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी नियमित बैठका घेऊन बँकांना उद्दिष्ट्य पूर्तीसाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबवली गेली. सर्व बँकांनी वेळेत उद्दिष्ट्य पूर्ण केल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यातही अशीच सहकार्यभावना ठेवण्याचे आवाहन केले.

युवकांनी योजनांचा लाभ घ्यावा

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाबरोबरच केंद्र शासनाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतही जिल्ह्यातील बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

प्राची सुतार.

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...