गुहागर-विश्रामगृह रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ‘गुहागर स्टाईल’ आंदोलनाची तयारी; २० एप्रिल रोजी महत्वाची बैठक
रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी उद्या सकाळी ११ वाजता ‘जानकी निवास’ येथे नागरिकांची बैठक; एक मे पासून उपोषण आणि उग्र आंदोलनाचा इशारा
आबलोली (संदेश कदम) – गुहागर ते शासकीय विश्रामगृह या प्रमुख मार्गाची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. हा रस्ता आता धोकादायक आणि वाहतुकीसाठी अयोग्य झाला असून, प्रशासन व संबंधित ठेकेदारांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर उद्या रविवारी, २० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जानकी निवास येथे वाहनचालक, मालक आणि जागृत नागरिकांची एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असून, सर्व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार पराग कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते विशवनाथ रहाटे यांनी केले आहे.
प्रवासी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे यांनी याआधीच प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. सोमवारी होणाऱ्या लोकशाही दिनातही हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर उपस्थित केला जाणार असून, यावर योग्य निर्णय न झाल्यास एक मेपासून उपोषण आणि त्यानंतर ‘गुहागर स्टाईल’ने उग्र आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा पराग कांबळे, विशवनाथ रहाटे, विकास जाधव, शाम साटले, बाबुशेट गुहागरकर, वसंत बेटकर, प्रभूनाथ देवळेकर, विद्याधर गोयथळे, ॲड. दिनेश कदम, विकास भागडे, प्रवीण साटले यांसारख्या विविध कार्यकर्त्यांनी दिला आहे.
गुहागर हे जागतिक पर्यटन केंद्र असूनसुद्धा त्याच्या प्रवेशद्वाराचा रस्ता खराब अवस्थेत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, वाहनधारक, प्रवासी आणि नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.
हॅशटॅग्स:
#गुहागर #रस्ता_दुरुस्ती #गुहागरआंदोलन #विश्रामगृहमार्ग #परागकांबळे #जनतेचा_आवाज #RatnagiriNews #गुहागरप्रेमी