स्वारगेटच्या हॉटेलमधून निलंबित PSI रणजित कासले अटकेत; एन्काऊंटर प्रकरणावर खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत दावा करणाऱ्या कासलेंना बीड पोलिसांनी अटक केली असून कारवाईचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
पुणे – बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) रणजित कासले यांना आज (शुक्रवारी) पहाटे पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमधून बीड पोलिसांनी अटक केली. कासले काल (गुरुवारी) संध्याकाळी दिल्लीहून पुण्यात दाखल झाले होते आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत भाष्य न करता विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्याचा दावा केला होता.
प्रसारमाध्यमांशी बोलताना, “मी आधी पोलिसांकडे आत्मसमर्पण करणार आहे”, असं सांगून त्यांनी पुणे पोलिसांकडे सरेंडर होण्याची घोषणा केली होती. मात्र आत्मसमर्पण होण्याआधीच बीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. कासले पुण्यात मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली असून या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे, कासले यांनी माध्यमांसमोर दिलेल्या वक्तव्यात खळबळजनक आरोप करत दावा केला की, “बोगस एन्काऊंटरसाठी केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहसचिव यांच्यात गुप्त बैठक होते. अशाच एका ऑपरेशनसाठी मलाही ऑफर देण्यात आली होती.”
ते पुढे म्हणाले, “तुम्ही रिव्हॉल्व्हर घेऊन २४ तास त्यांच्या मागे राहा, चुकीचं वाटल्यास कारवाई करा, असं मला सांगण्यात आलं. माझ्या शेष सेवा काळात १५ कोटी पगार मिळाला असता, त्याऐवजी लमसम ५० कोटी मिळतील अशी ऑफर होती. पुन्हा चौकशी झाली, तरी आमचं सरकार असल्याने निर्दोष मुक्त करु असं सांगण्यात आलं.”
कासलेंच्या या दाव्यांमुळे राज्यातील राजकीय आणि पोलिस यंत्रणेत खळबळ माजली आहे. बीड पोलिसांच्या पुढील चौकशीमध्ये या प्रकरणाला कोणते वळण लागते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हॅशटॅग्स:
#RanajitKasle #PSIArrested #FakeEncounterClaim #BeedPolice #SwargateHotel #ValmikKarad #MaharashtraPolitics #CCTVFootageViral