रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबईला बदली!
दोन वर्षांहून अधिक कार्यकाळानंतर विशेष शाखा, बृहन्मुंबई येथे बदली;
रत्नागिरी | प्रतिनिधी –
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बदली करण्यात आली असून त्यांची नवीन नियुक्ती विशेष शाखा, बृहन्मुंबई येथे करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीची बातमी संध्याकाळी समोर येताच जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
कुलकर्णी यांनी गेली दोन-अडीच वर्षे रत्नागिरीत पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. या कालावधीत त्यांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवत, जिल्ह्यातील विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधत उल्लेखनीय कार्य केले.
ते फक्त पोलीस यंत्रणेपुरतेच मर्यादित न राहता, विविध सामाजिक उपक्रमातही सक्रिय सहभाग घेत होते. नागरिकांशी सुसंवाद, प्रसंगी मदतीचा हात आणि प्रसारमाध्यमांशी सकारात्मक संबंध यामुळे त्यांची प्रतिमा एक प्रभावशाली आणि जनतेशी जोडलेली अधिकारी अशी होती.
धनंजय कुलकर्णी यांच्या जाण्याने रत्नागिरीकरांना खंत वाटत असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
—
#धनंजयकुलकर्णी #रत्नागिरीपोलिस #पोलीसबदली #मुंबईविशेषशाखा #ratnagirivartahar