भारतीय सैनिकांना मानवंदन! रत्नागिरीत ‘शौर्यवंदना तिरंगा रॅली’स भव्य प्रतिसाद
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शहरात देशप्रेमाचा उत्स्फूर्त जल्लोष; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
रत्नागिरी – पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिलं. या शौर्यगाथेचा गौरव करण्यासाठी आणि वीर जवानांना मानवंदना वाहण्यासाठी रत्नागिरीत आज ‘शौर्यवंदना तिरंगा रॅली’चे भव्य आयोजन करण्यात आले. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हजारो रत्नागिरीकरांनी देशभक्तीच्या घोषणांनी शहर दणाणून सोडलं.
रॅलीची सुरुवात मारुती मंदिर येथून झाली. अमर जवान प्रतिमेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ झाला. पोलिस बँडने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करत वातावरण भारून टाकलं. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय जवान जय किसान’ अशा घोषणांनी संपूर्ण रस्ता देशभक्तीच्या भावना व्यक्त करत होता.
या वेळी डॉ. सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “रत्नागिरीकरांचा प्रतिनिधी म्हणून मी व्यासपीठावर आहे. ही रॅली केवळ प्रशासनाची नाही, तर रत्नागिरीकरांच्या राष्ट्रप्रेमाची आहे.” त्यांनी घाटकोपरमधील हुतात्मा जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचा उल्लेख करत भावनिक आठवणीही शेअर केल्या.
रॅली दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माजी सैनिक अमृत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शेवटी जयस्तंभ येथे पालकमंत्री डॉ. उदय सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व निवृत्त कर्नल प्रशांत चतुर यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून रॅलीची सांगता झाली.
रॅलीमध्ये राजेश सावंत, राहुल पंडित, बिपीन बंदरकर, वकील बंटी वणजू, कांचनताई परुळेकर यांच्यासह विविध संघटना, शासकीय यंत्रणा, पोलीस दल आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही रॅली रत्नागिरीकरांच्या देशप्रेमाचे प्रतीक ठरली.
हॅशटॅग्स:
#शौर्यवंदना #तिरंगा_रॅली #रत्नागिरी #भारतीय_सैनिक #देशप्रेम #उदयसामंत #JaiJawan #VandeMataram #RatnagiriNews #शौर्यगाथा
फोटो