न्यूयॉर्कमध्ये मॅक्सिकन नौदलाच्या जहाजाचा अपघात! ब्रुकलिन ब्रीजला धडकलं, १९ जण जखमी
२७७ प्रवाशांना घेऊन निघालेलं प्रशिक्षण जहाज “कुआउटेमोक” ब्रुकलिन ब्रीजच्या खालून जाताना धडकलं; नौदलाने अपघाताची चौकशी सुरू केली
बातमी…..
न्यूयॉर्क – अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध ब्रुकलिन ब्रीजखाली एक मोठा अपघात घडला आहे. मॅक्सिकोच्या नौदलाचे प्रशिक्षण जहाज “कुआउटेमोक” ब्रिजला धडकले. या घटनेत १९ प्रवासी जखमी झाले असून जहाजात एकूण २७७ जण प्रवास करत होते. ही माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली आहे.
प्रशिक्षणार्थींना घेऊन निघालेलं हे जहाज पूर्व नदीवरून जात असताना त्याचा वरचा भाग थेट ब्रिजला धडकला. यामुळे मोठा आवाज झाला आणि बोट काही काळासाठी अनियंत्रित झाली. घटनास्थळी न्यूयॉर्क फायर डिपार्टमेंटच्या टीमने तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केलं.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जहाजावर मॅक्सिकोचा तिरंगा स्पष्टपणे दिसतो. जहाज ब्रिजखाली जात असतानाच टक्कर होते आणि मग ते नदीच्या किनाऱ्यावर स्थिरावलेले दिसते.
मॅक्सिकन नौदलानेही अपघाताची पुष्टी करत जहाजाचा प्रवास तात्पुरता थांबवण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. “कुआउटेमोक” हे जहाज मॅक्सिकन नौदल स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून ६ एप्रिल रोजी अकापुल्को बंदरावरून रवाना झालं होतं. या २५४ दिवसांच्या समुद्री मोहिमेत जहाज १५ देशांतील २२ बंदरांना भेट देणार होतं.
या अपघाताची चौकशी सुरू झाली असून, जहाजाच्या सुरक्षिततेसंदर्भात योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याचं नौदलाकडून सांगण्यात आलं आहे.
हॅशटॅग्स:
#NewYork #BrooklynBridgeAccident #MexicanNavy #Cuauhtémoc #BreakingNews #MarineAccident #InternationalNews #RatnagiriVartahar
फोटो
साभार: रॉयटर्स, सोशल मीडिया क्लिप्स
बातमी स्रोत: रत्नागिरी वार्ताहर