मातोश्रीपासून मुंबईच्या गल्लीबोळांपर्यंत – वाटद MIDC विरोधी लढा पेटला!

मुंबई प्रतिनिधी :- निलेश रहाटे
रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद MIDC प्रकल्पाविरोधातील ग्रामस्थांचा लढा आता थेट मुंबईत धडकला आहे. काल उशिरा रात्री मातोश्रीच्या गेटवरच वाटद MIDC विरोधी जनसंवाद महासभेचा बॅनर लावण्यात आला.
फक्त एवढंच नव्हे, तर मुंबईतील अनेक ठिकाणी हे बॅनर झळकत असून या आंदोलनाची धग आता राजधानीच्या प्रत्येक गल्लीबोळात पोहोचत असल्याचे चित्र दिसत आहे.
दि. 17 ऑगस्ट 2025, सकाळी 9.30 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन हॉल, दादर (पूर्व), मुंबई
येथे कोकणातील ग्रामस्थांचा विराट “जनसंवाद महासभा” होणार आहे.
या महासभेत संविधान तज्ज्ञ अॅड. असीम सरोदे मार्गदर्शन करणार असून, अॅड. रोशन पाटील आणि अतुल म्हात्रे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या लढ्याचे नेतृत्व वाटद MIDC विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रथमेश गावणकर करत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचा आवाज आता अधिक तीव्र होत चालला आहे.
ग्रामस्थांच्या हक्कांसाठी, जमीन अधिसूचना रद्द करण्यासाठी आणि स्थानिकांचा आवाज बुलंद करण्यासाठी ही लढाई अधिक उग्र होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
कोकणातील लढा आता केवळ रत्नागिरीपुरता मर्यादित न राहता, मुंबईच्या हृदयात झळकू लागल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या महासभेकडे लागले आहे.

















