साटवली विकास संस्थेच्या सचिवांच्या कारभाराविरुद्ध तक्रारींचा पाढा; सहकार अधिकाऱ्यांच्या पत्रालाही दाखवली ‘केराची टोपली’

साटवली विकास संस्थेच्या सचिवांच्या कारभाराविरुद्ध तक्रारींचा पाढा; सहकार अधिकाऱ्यांच्या पत्रालाही दाखवली ‘केराची टोपली’

लांजा (प्रतिनिधी- जितेंद्र चव्हाण ):

साटवली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, साटवली (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील संस्थेचे सचिव श्री. राजेश शेरे यांच्या मनमानी कारभाराबाबत आणि सभासदांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत तक्रारी समोर आल्या आहेत. याप्रकरणी ‘सहकारी अधिकारी श्रेणी-१, सहकारी संस्था, लांजा’ यांनी संस्थेच्या अध्यक्षांना (चेअरमन) वारंवार पत्रव्यवहार करूनही संस्थेच्या वतीने कोणतीही ठोस कारवाई अथवा अहवाल सादर न केल्याने सहकार विभागाच्या पत्रांनाच केराची टोपली दाखवल्याचे उघडकीस आले आहे.

 

नेमके प्रकरण काय?

साटवली-लावणंगवाडी येथील तक्रारदार श्री. जितेश सुरेश चव्हाण यांनी ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी सहकार विभागाकडे एक तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जात त्यांनी साटवली विकास संस्थेच्या सचिवांच्या कारभाराबाबत पुढील बाबी नमूद केल्या होत्या:

 

१. कार्यालयीन वेळेत अनुपस्थिती: सचिव श्री. राजेश शेरे हे संस्थेच्या कार्यालयात उपस्थित न राहता आपल्या राहत्या घरातूनच संस्थेचे कामकाज चालवतात.

 

२. अरेरावी आणि उद्धट भाषा: कामासाठी किंवा चौकशीसाठी संस्था कार्यालयात अथवा सचिवांच्या घरी गेले असता, ते सभासदांशी उद्धट, अरेरावीच्या आणि मोठ्या आवाजात संभाषण करतात.

 

३. नवीन सभासदत्व व कर्जास नकार: नवीन सभासद करून घेणे आणि नवीन सभासदांना कर्ज वाटप करणे याबाबत सचिव सतत नकारात्मक भूमिका घेतात.

 

४. माहितीचा अभाव व गैरसोय: शासनाच्या विविध योजनांची माहिती सभासदांपर्यंत पोहोचवली जात नाही. तसेच संस्थेच्या कामाची वेळ कधीही नोटिस बोर्डावर लावलेली नसते, ज्यामुळे सभासदांची मोठी गैरसोय होते.

 

५. मनमानी कारभार: संस्थेचे कामकाज सचिवांच्या मर्जीनुसारच चालत असून, मूळ सभासदांना योग्य ते सहकार्य किंवा कर्ज मिळत नाही, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.

 

सहकार विभागाच्या पत्रांकडे दुर्लक्ष

या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने लांजा येथील सहकारी अधिकारी श्रेणी-१ (संतोषकुमार पाटील) यांनी यापूर्वी:

 

दि. १८/०२/२०२५ (पत्र क्र. १२५)

 

दि. ०२/०४/२०२५ (पत्र क्र. ०३)

 

दि. ३०/१२/२०२५ (पत्र क्र. ३१३)

 

आणि दि. ०८/०७/२०२६ (पत्र क्र. २०५)

 

अशा अनेक पत्रांद्वारे संस्थेच्या अध्यक्षांना तक्रार अर्जातील मुद्यांबाबत संस्थेच्या स्तरावर चौकशी करून, योग्य ती कारवाई करून त्याचा अहवाल कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश दिले होते.

 

परंतु, सहकार अधिकाऱ्यांनी वारंवार स्मरणपत्रे देऊनही साटवली संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व सचिवांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही आणि तक्रारदाराच्या अर्जाचा कोणताही समाधानकारक निकाल लावलेला नाही.

 

सभासदांमध्ये तीव्र असंतोष

शासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला आणि पत्रांना न जुमानता साटवली विकास संस्थेचे सचिव व पदाधिकारी मनमानी कारभार करत असल्याने साटवली परिसरातील शेतकरी व सभासदांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याप्रकरणी आता वरिष्ठ सहकार अधिकाऱ्यांनी स्वतः हस्तक्षेप करून संस्थेच्या सचिवांवर व संबंधितांवर कडक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी सभासदांकडून केली जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें