*रत्नागिरीत २३ ऑगस्टला ‘न्यायवेध सभा’; संविधान, न्याय आणि लोकशाहीवर होणार संवाद
*रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे
संविधान, न्याय आणि लोकशाही याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जनहित फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने रत्नागिरी येथे ‘न्यायवेध सभा’ आयोजित करण्यात आली आहे.
“संविधान, न्याय आणि लोकशाहीसाठी संवाद” या विषयावर होणाऱ्या या सभेत संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये तसेच लोकशाही व्यवस्थेत नागरिकांची भूमिका यावर संवाद साधला जाणार आहे.
संविधानावर आधारित लोकशाहीचा संकोच करण्याचे प्रयत्न होत असताना न्यायाची मागणी करणारे कार्यकर्ते, सरकारी कामकाजाचे विश्लेषण करणारे अभ्यासक आणि शासकीय कामातील त्रुटींवर प्रश्न उपस्थित करणारे नागरिक यांचा आवाज महत्त्वाचा असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. संविधान व कायद्याचा सन्मान राखत नागरिकांनी आपल्या हक्कांसाठी आणि कर्तव्यांसाठी जागरूक राहावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला संविधान विश्लेषक व सर्वोच्च न्यायालयाचे वकील अॅड. असीम सरोदे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून श्री. प्रथमेश गोपाळ गावणकर, संस्थापक – जनहित फाउंडेशन, महाराष्ट्र यांची भूमिका आहे.
रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता रत्नागिरी येथील रॉयल बँक्वेट हॉल, जे. के. फाईल येथे ही न्यायवेध सभा होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधान, न्याय आणि लोकशाहीवरील या संवादात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.








