शिपाई पदाची भरती प्रक्रिया रखडली; अंतिम मुदतीनंतर ६८ दिवस उलटूनही नियुक्ती नाही!
*पंचायत समिती रत्नागिरीच्या कार्यालयीन कामकाजाच्या गतीवर प्रश्नचिन्ह*
*रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे
ग्रामपंचायत वाटद-मिरवणे येथे शिपाई पदासाठी २३ जून २०२६ रोजी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १० जुलै २०२६ निश्चित करण्यात आली . ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या माहितीनुसार या पदासाठी चार अर्ज प्राप्त झाले आहेत.
मात्र अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत संपून तब्बल ६८ दिवस उलटूनही भरती प्रक्रिया पुढे सरकलेली दिसत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत व पंचायत समिती रत्नागिरीच्या कार्यालयीन कामकाजाची नेमकी अवस्था काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी, पात्र उमेदवारांची निवड आणि नियमानुसार नियुक्ती याबाबत आतापर्यंत नेमकी कोणती कार्यवाही झाली? प्रक्रिया पूर्ण करण्यास एवढा विलंब का होत आहे? ग्रामपंचायतीतील एका शिपाई पदाची भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठीही प्रशासनाला एवढा कालावधी लागत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या इतर प्रशासकीय कामांचे काय? असा सवाल RTI कार्यकर्ता व पत्रकार निलेश रहाटे यांनी उपस्थित केला आहे.
भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले, चार अर्ज प्राप्त झाले; मात्र त्यानंतर प्रक्रिया नेमकी कुठे अडकली आहे, याबाबत स्पष्टता नाही. कार्यालयीन फाईल पुढे सरकतेय की टेबलवरच धूळ खात पडली आहे? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
दरम्यान, वाटद ग्रामसेवकांशी संपर्क साधला असता, शिपाई पदाची भरती प्रक्रिया पंचायत स्तरावरून होणार असून त्याबाबत त्यांना कल्पना देण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया या महिन्यात पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
मात्र अंतिम मुदत संपून ६८ दिवस उलटूनही प्रक्रिया पूर्ण न झाल्यानंतर आता ‘या महिन्यात पूर्ण होईल’ या आश्वासनाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कधी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भरती प्रक्रिया रखडण्यामागे नेमका अडथळा कोणता? पंचायत समिती स्तरावर आतापर्यंत कोणती कार्यवाही झाली? संबंधित फाईल सध्या कोणत्या स्तरावर आहे? आणि अर्जदारांना नियुक्तीसाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार?
या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे पंचायत समिती रत्नागिरी प्रशासनाने देणे अपेक्षित आहे. कार्यालयीन कामकाजात अनावश्यक विलंब होणार नाही आणि नागरिकांची कामे वेळेत होतील, याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची आहे. त्यामुळे आता या भरती प्रक्रियेला गती देऊन नियुक्ती कधी केली जाते, याकडे वाटद-मिरवणे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.











