गुहागर आगाराला मिळणार 15 नवीन बस; आमदार भास्कर जाधव यांची प्रभावी मागणी फळाला
गुहागर आगारातील बसगाड्या गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या असून, त्यांची वारंवार होणारी नादुरुस्ती प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. काही बसगाड्या गळक्या असल्याने पावसाळ्यात प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. तात्पुरती दुरुस्ती करून त्या सेवेत आणल्या जात असल्या तरीही प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयीसुविधा यावर परिणाम होत आहे.
ही परिस्थिती लक्षात घेऊन गुहागर विधानसभेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन गुहागर आगारासाठी 15 नवीन बसगाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांनी दिलेल्या मागणीवजा निवेदनाला मंत्री सरनाईक यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद दिला आणि संबंधित अधिकाऱ्यांना नवीन बसगाड्या मंजूर करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे लवकरच गुहागर आगाराला 15 नवीन बस मिळणार आहेत.
मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार भास्कर जाधव यांनी प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या जुन्या आणि बंद पडणाऱ्या शिवशाही बसगाड्या बंद करून त्याऐवजी वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई गाड्या द्याव्यात, अशीही मागणी केली.
यामुळे गुहागर आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांसाठी सुखद प्रवासाची दारे खुली होणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने हा मोठा निर्णय ठरणार आहे.