वेळंब घाडेवाडी अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन; भाजपचे श्रेयावर ठाम मत
ज्यांचा काडीचाही सबंध नाही ते आता श्रेय घ्यायला येतील-निलेश सुर्वे
वेळंब घाडेवाडी अंगणवाडी इमारतीचे डोंगरी कार्यक्रम जिल्हा नियोजन अशासकीय सदस्य नागेश धाडवे यांच्याहस्ते भूमीपूजन
गुहागर (प्रतिनिधी आशिष कर्देकर)
वेळंब घाडेवाडी येथे अंगणवाडी इमारतीच्या बांधकामासाठी डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत निधी मंजूर करण्यात आला असून, या कामाचे भूमिपूजन नुकतेच जिल्हा नियोजन अशासकीय सदस्य नागेश धाडवे यांच्या हस्ते पार पडले. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या कामासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेष प्रयत्न केले असून, ज्यांचा या कामाशी काहीही संबंध नाही ते आता श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
भाजपच्या प्रयत्नातून मंजुरी
या अंगणवाडी इमारतीच्या मंजुरीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते डॉ. विनय नातू, जिल्हा नियोजन समिती सदस्य नागेश धाडवे आणि तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे काम मंजूर झाले असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला.
श्रेयवादावरून संताप
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे म्हणाले, “या कामाशी ज्यांचा काहीही संबंध नाही, ते आता श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हा प्रकल्प केवळ भाजपच्या प्रयत्नांतून मंजूर झाला आहे. अजूनही गावातील दोन विकासकामे भाजपच्या माध्यमातून मंजूर करून आणली जात आहेत. त्यामुळे उगाचच भूमिपूजनासाठी कोणीही धडपड करू नये.”
ग्रामस्थांचा पाठिंबा
या कार्यक्रमास भाजप महिला तालुकाध्यक्ष अपूर्वा बारगोडे, तालुका उपाध्यक्ष मंगेश रांगळे, उपसरपंच श्रीकांत मोरे, अमित ओक, बूथ प्रमुख समीर वेल्हाळ यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनीही या प्रकल्पासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे समर्थन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मोरे यांनी केले.