नागपुरात धार्मिक तणाव: चादर जाळल्याच्या घटनेनंतर मुस्लिम समाजाची संतप्त प्रतिक्रिया

नागपूर: मागील काही महिन्यांपासून औरंगजेबाच्या मुद्द्यावरून सातत्याने धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मुस्लिम समाजाने संयम बाळगला. तरीही समाजाला चिथावण्यासाठी आता ‘आयत’ असलेली चादर जाळल्याची घटना घडली. त्यानंतर काही भागांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, या घटनेनंतर पोलिसांनी भेदभाव करत केवळ मुस्लिम समाजावरील कारवाईला प्राधान्य दिल्याचा आरोप नागपूर मुस्लिम कम्युनिटीने बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
सोमवारी रात्री मध्य नागपुरात दंगल उसळल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, मुस्लिम नेत्यांनी पोलिसांवर निष्पक्ष कारवाई न केल्याचा आरोप केला आहे.
“मुस्लिमांना चिथावण्याचे षडयंत्र”
पत्रकार परिषदेत डॉ. मोहम्मद अवेस हसन यांनी सांगितले की, मुस्लिम समाजाने संयम बाळगला असला तरी, काही कट्टरवादी गटांकडून त्यांना चिथावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिमांसाठी पवित्र मानली जाणारी ‘आयत’ असलेली चादर जाळली. हा मुद्दा अत्यंत संवेदनशील असून, समाजाच्या भावना दुखावण्याचा हा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले.
यामुळे काही भागांत नैसर्गिक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, त्याला संपूर्ण मुस्लिम समाजाशी जोडणे चुकीचे आहे. “दुर्दैवाने, पोलिसांनी निष्पाप मुस्लिम युवकांवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल केले, तर प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्या लोकांवर केवळ सौम्य कारवाई केली आणि त्यांना काही तासांत सोडून दिले,” असा आरोप त्यांनी केला.
“सरकारने एका बाजूने भूमिका घेतली”
माजी मंत्री अनीस अहमद यांनी राज्य सरकारवरही टीका केली. “सरकारने दोन्ही समाजांना समान न्याय द्यावा, परंतु येथे एका समाजाला लक्ष्य केले जात आहे. निष्पाप तरुणांना अटक केली जात असून, काही अल्पवयीन मुलांवरही कठोर कायदे लावण्यात आले आहेत. ही पक्षपाती भूमिका लोकशाहीसाठी घातक आहे,” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेण्याची मागणी
नागपूर मुस्लिम कम्युनिटीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. “शांतता राखण्यासाठी तातडीने ‘शांतता समिती’ स्थापन करावी. संचारबंदी उठवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा,” अशी मागणी करण्यात आली.
या पत्रकार परिषदेला डॉ. मोहम्मद अवेस हसन, हाजी मोहम्मद ताहिर रजा, मुक्ती मुज्तबा शरीफ, माजी मंत्री अनीस अहमद, ॲड. आसिफ कुरैशी, फैसल रंगूनवाला, ॲड. सैयद शूजाउद्दीन आदी उपस्थित होते.